पीटीआय, नवी दिल्ली
व्यापार आणि गुंतवणुकीसाठी जगाला स्थिर आणि अंदाज लावण्यायोग्य वातावरण हवे आहे, तसेच आर्थिक व्यवहार हे न्याय्य, पारदर्शक आणि सर्वांच्या फायद्याचे असावेत असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी व्यक्त केले. दूरदृश्य प्रणालीने ‘ब्रिक्स’ परिषदेला संबोधित करताना जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली.
अमेरिकेने भारतासह विविध देशांवर लादलेल्या आयातशुल्कामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर जयशंकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय व्यापार यंत्रणेसाठी खुला, न्याय्य, पारदर्शक आणि भेदभावरहित दृष्टिकोन हे पायाभूत तत्त्व असून त्याचे संरक्षण झाले पाहिजे, यावर भारताचा ठाम विश्वास आहे. या परिषदेत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह इतर देशांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनाशियो लुला दा सिल्वा हे या परिषदेचे यजमान होते. अमेरिकेचे व्यापार धोरण आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले आयातशुल्क या मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व केले.
व्यापाराला चालना देण्यासाठी जगाला शाश्वत अशा रचनात्मक आणि सहकार्याचा दृष्टिकोनाची गरज आहे, असे जयशंकर म्हणाले. अडथळे उभे करणे आणि व्यवहार गुंतागुंतीचे करणे यामुळे कोणाचाही फायदा होणार नाही. तसेच व्यापारी मुद्द्यांना बिगर-व्यापारी मुद्द्यांशी जोडण्याचाही उपयोग नाही, असे मत त्यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता व्यक्त केले.
झेलेन्स्की यांच्याकडून आयातशुल्काचे समर्थन
वॉशिंग्टन : रशियाबरोबर व्यवहार करणाऱ्या देशांवर आयातशुल्क लादणे ही योग्य कल्पना आहे, असे मत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी व्यक्त केले आहे. मात्र, त्यांनी भारताचे नाव घेतले नाही. ‘एबीसी न्यूज’च्या ‘धिस वीक’ या रविवारी प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमामध्ये मुलाखत देताना झेलेन्स्की यांनी याप्रमाणे मत व्यक्त केले. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे छायाचित्र पाहिल्यानंतर, आयातशुल्क लादण्याची योजना उलटली असे वाटते का,’’ असा प्रश्न झेलेन्स्की यांना मुलाखतकाराने विचारला होता.