मध्य प्रदेशातील लक्ष्मी नारायण मंदिराचे फोटो काढताना एका ब्रिटिश पर्यटकाचा मृत्यू झाला. ३० फूट उंचीवरून हा पर्यटक फोटो काढत होता. मात्र त्याचा पाय घसरला आणि खाली पडून मृत्यू झाला. रॉजर स्टोट्सबरी असे या पर्यटकाचे नाव होते आणि तो ५६ वर्षांचा होता. मध्य प्रदेशातील ओरछा या ठिकाणी ही घटना घडली असून ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. रॉजर हा लक्ष्मी नारायण मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर उभा होता. तो अगदी कडेला उभा राहून फोटो घेत होता आणि अचानक त्याचा पाय घसरला आणि तो पडला अशी माहिती पोलिसांनी दिली.

रॉजरने या ठिकाणचे काही फोटो काढले. त्याला आणखी काही चांगले फोटो काढायचे होते म्हणून तो लक्ष्मीनारायण मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला होता. तिथे गेल्यावर आणखी चांगले फोटो काढता येऊ शकतील असे रॉजरला वाटले होते. पण त्याचा पाय घसरला आणि याच घटनेत त्याचा अंत झाला अशी माहिती त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने दिली. रॉजर त्याच्या पत्नीसह भारतात आला होता. रॉजर आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या टूरला इटलीपासून सुरुवात केली होती. काही दिवसांपासून ते भारतात आले होते. ताजमहाल या ठिकाणी काढलेला फोटोही त्यांनी एक दिवसापूर्वीच पोस्ट केला होता.