पीटीआय, हैदराबाद : केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने गेल्या नऊ वर्षांच्या शासनकाळात तेलंगणच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप तेलंगणच्या सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी शुक्रवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी होत असलेल्या तेलंगणा दौऱ्यावर पक्ष बहिष्कार टाकणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे पुत्र असलेल्या रामाराव यांनी आरोप केला, की मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून तेलंगणविरोधी भूमिका घेत आहेत. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यांतर्गत तेलंगणाला दिलेली आश्वासने केंद्राने पूर्ण केली नाहीत. मोदींनी गुजरातमधील दाहोद येथे एका वर्षांपूर्वी २० हजार कोटी रुपयांच्या रेल्वे इंजिन कारखान्याची पायाभरणी केली, तर तेलंगणासाठी केवळ ५२१ कोटींच्या मालगाडी डबे उत्पादन कारखाना उभारण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेश राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत तेलंगणात रेल्वे डबेनिर्मितीचा कारखाना उभारला जाणार होता. गुजरातसाठी २० हजार कोटींच्या  कारखान्याची खिरापत वाटली, तर तेलंगणासाठी अवघ्या ५२१ कोटींच्या कारखान्याला मंजुरी मिळाली.

 नागरी विकास मंत्री असलेले रामाराव म्हणाले की, एका खासगी कंपनीने तेलंगणात एक हजार कोटी  गुंतवून रेल्वे डब्यांचा कारखाना उभारला आहे. अवघे ५२१ कोटी खर्चून कारखाना उभारल्यास तेलंगणवासीय मोदींना स्वीकारणार नाहीत. राज्य सरकारने वारंगळजवळ आदिवासी विद्यापीठासाठी ३०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे, परंतु अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींवरही टीका

खम्मम येथे झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडे ‘बीआरएस’वर टीका करताना ‘बीआरएस’ हा भाजपचा दुय्यम संघ (‘ब संघ’) असल्याची टीका केली होती. त्याबाबत रामाराव म्हणाले, की राहुल गांधी कोणत्या अधिकारात अशा धोरणात्मक विषयांवर बोलत आहेत. ते कोणत्या अधिकारात अशी वक्तव्ये करत आहेत? ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत का? ते तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत का? ते खासदार आहेत का?