पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी लागेबांधे असलेल्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) घरभेद्याची चौकशी सुरू करण्यात आली असून त्याने कोणती माहिती फोडली असावी याचा अंदाज बांधण्यात येत आहे, असे सीमा सुरक्षा दलाच्या वतीने मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.
बीएसएफचे प्रमुख देवेंद्रकुमार पाठक यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला बीएसएफचा कर्मचारी दलात अत्यंत खालच्या स्तरावरील कर्मचारी होता, त्यामुळे त्याच्याकडे सीमेवरील भागांतील कारवाईबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती असणे शक्य नाही.
सीमा सुरक्षा दलाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्यामध्ये दुर्दैवाने एक घरभेदी सापडला आहे, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्याचे आमच्याकडे उपाय आहेत आणि आम्ही यंत्रणा अधिक बळकट करू, असेही पाठक म्हणाले.
हेडकॉन्स्टेबल अब्दुल रशीद याला हेरगिरीप्रकरणी पकडण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे, मात्र त्याच्या उद्देशाबाबत आता भाष्य करणे अनुचित ठरेल. त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच तो यामध्ये कितपत गुंतलेला आहे त्याचा
आणि त्याने कोणती माहिती फोडली याचा अंदाज येईल, असेही ते म्हणाले.