कैराना : उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघात ओळखपत्र जवळ नसलेल्या काही लोकांनी गुरुवारी मतदान करण्यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी हवेत गोळीबार केला.
ही घटना कांढला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रसूलपूर गुजरान खेडय़ातील एका मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सागितले.
ओळखपत्रांशिवाय मतदानसाठी आलेल्या काही लोकांनी मतदान केंद्रांमध्ये बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न केला. मतदान अधिकाऱ्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रावर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी हवेत गोळीबार केल्यानंतर गोंधळ झाला. नंतर पोलीसही घटनास्थळी पोहचले. परिस्थिती आता नियंत्रणाखाली असून मतदान सुरळीतपणे सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी मात्र पोलिसांचे म्हणणे नाकारले. मतदान अधिकाऱ्यांनी आपली मते समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला टाकली, मात्र आपल्याला इतर कुणाला मतदान करायचे होते असा आरोप अजमेर सिंह व पहलसिंह या दोन गावकऱ्यांनी केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून बीएसएफच्या जवानांनी हवेत गोळीबार केला व त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले, असा दावा गावकऱ्यांनी केला.