BSNL Operation Sindoor Recharge Plan : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले. ‘ऑपरेशन सिंदूर’सह शूरवीर जवानांनी दहशतवादाला सडेतोड उत्तर दिले. तर सशस्त्र दलाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी एका दूरसंचार कंपनीने एक नवा रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे; ज्याचा ग्राहकांनाही फायदा होणार आहे.
सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएलने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान आपल्या सशस्त्र दलाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी एक नवा रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, प्रत्येक रिचार्जमधून मिळणाऱ्या पैशाचा एक भाग संरक्षण विभागाला दान केला जाईल. याव्यतिरिक्त, युजर्सना लाभ म्हणून कॅशबॅक देखील दिला जाईल. तर या रिचार्ज प्लॅनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…
बीएसएनएलचा १,४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (BSNL 1,499 recharge Plan)
सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी बीएसएनएल मर्यादित काळासाठी ही खास ऑफर सुरू ठेवणार आहे. जर एखाद्या ग्राहकाने १,४९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन केला तर कंपनी त्या रकमेपैकी २.५ टक्के रक्कम संरक्षण विभागाला देईल. या व्यतिरिक्त, ग्राहकांना त्यांच्या रिचार्जच्या २.५ टक्के रक्कम कॅशबॅक म्हणून मिळेल. ही ऑफर ३० जूनपर्यंत उपलब्ध असणार आहे.
१,४९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे (1,499 Recharge Plan Benefits)
बीएसएनएलचा १,४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅनची वैधता ३३६ दिवसांची आहे. युजर्स संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल, मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि दररोज १०० एसएमएसचा आनंद घेऊ शकतात. या ११ महिन्यांच्या प्लॅनमध्ये एकूण २४ जीबी डेटा देखील समाविष्ट असणार आहे. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, युजर्स ४० केबीपीएस वेगाने अमर्यादित इंटरनेट वापरू शकतात.