जुमलेबाजी बंद करो, १५ लाख का क्या हुआ, मॅच फिक्सिंग बंद करो अशा घोषणांनी विरोधकांनी लोकसभा दणाणून सोडली. शेवटी विरोधकांच्या गोंधळातच मोदींना भाषण करावे लागले. तब्बल दीड तास मोदींनी भाषण केले आणि या भाषणादरम्यान विरोधकांच्या घोषणाबाजीच सुरुच होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत भाषण केले. मोदी भाषणाला उभे राहताच तेलगू देसम पक्ष आणि अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरु केली. ‘बंद करो बंद करो, जुमलेबाजी बंद करो’, ‘क्या हुआ, क्या हुआ, १५ लाख का क्या हुआ’, मॅच फिक्सिंग बंद करो अशा घोषणा देत विरोधकांनी मोदींच्या भाषणात व्यत्यय आणला. आंध्रप्रदेशचा पुळका दाखवण्याचे नाटक बंद करा, राजकीय पक्षांना धमकावू नका, अशा घोषणा विरोधक देत राहिले.
मोदींनी भाषणात काँग्रेसचा समाचार घेतला. ‘योजना आमची होती, संकल्पना आमचीच होती असे काँग्रेसचे नेते सांगतात. पण तुमच्या कामाची पद्धत काय होती. जोपर्यंत नातेवाईकांचा फायदा होत नाही तोपर्यंत तुमची गाडी पुढे सरकरतच नव्हती, असे टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. तेलंगण राज्याची स्थापना व्हावी अशी आमचीदेखील भूमिका होती. पण राजकारणापायी तुम्ही घाई करत आंध्रप्रदेशवर अन्याय केला, असा आरोप मोदींनी केला.