Bulandshahr : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर चालत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी तीन तरुणांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

नोकरी देण्याचं आमिष दाखवून नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. तसेच दुसऱ्या एका मुलीला चालत्या कारमधून खाली फेकून देण्यात आलं. यावेळी चालत्या कारमधून खाली फेकून देण्यात आलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, “आम्हाला असं आढळून आलं की, दुसरी मुलगी म्हणजे तक्रारदार मुलीची मैत्रीण देखील घटनास्थळी होती. मात्र, तिला आरोपींनी चालत्या गाडीतून बाहेर फेकलं आणि तिचा यामध्ये मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणात मेरठ पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं दिनेश कुमार सिंह यांनी सांगितलं”.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “शनिवारी दुपारी २:३० च्या सुमारास बुलंदशहर-अलिगड महामार्गावरील अर्निया पोलीस स्टेशन परिसरात खुर्जा नगर आणि अर्नियाच्या पोलीस पथकामध्ये चकमक झाली. यामध्ये दोन संशयित जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुलंदशहर पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली असून संदीप सिंग (२३), अमित (२२), गौरव (२२) या तिघांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोलीस पथकाने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लवकरच खुर्जा नगर पोलीस ठाण्याला आरोपीच्या गाडीची माहिती मिळाली आणि दुसरी टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी तिन्ही संशयितांना घेरलं आणि गोळीबार केला आणि यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.