Bulandshahr violence: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. मात्र अशा परिस्थितीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या आणि दिनेश शर्मा यांचा मात्र काहीच पत्ता नव्हता. धक्कादायक म्हणजे हिंसाचारात दोघांनी आपला जीव गमावला होता. यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचा समावेश होता. मात्र इतकं असतानाही काहीच घडलं नसल्याप्रमाणे योगी आदित्यनाथ गोरखपूरमध्ये लाइट आणि साऊंड शो मध्ये हजेरी लावून आनंद लुटत होते.

एकीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमध्ये असताना उपमुख्यमंत्री प्रसाद मौर्या आणि दिनेश शर्मा यांचाही काही पत्ता नव्हता. कारण दोघेही राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. विशेष म्हणजे 10 वाजण्याच्या सुमारास योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमाचे फोटोही ट्विट केले.

धक्कादायक म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासहित एका कबड्डी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर देणं टाळलं. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत एकीकडे शहर जळत असताना तुम्ही कार्यक्रमात कसे काय व्यस्त असू शकता असा प्रश्न विचारला.

दरम्यान संतप्त ग्रामस्थ आणि हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेले पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांनी भेट देण्याची मागणी करत आहेत. सुबोध यांची बहिण सरोज सिंग चौहान यांनी हत्येमागे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने घटनेचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक गठीत केलं आहे. कोणत्या परिस्थितीत हिंसा घडली आणि त्यात कोण सहभागी होते याचा शोध घेतला जात आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी हिंसाचारामागे योगेश राज असल्याचं सांगत सध्या तो फरार असल्याची माहिती दिली आहे. मात्र त्याच्याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार, योगेश राज हा बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे.