तीन दहशतवादी व १८ देशांतील २३ जण ठार; १२६ ओलिसांची सुटका
बुर्किना फासो येथे अल कायदाशी संबंधित दहशतवाद्यांनी हॉटेल व रेस्टॉरंटला वेढा दिला असता सुरक्षा दलांनी तेथे घुसून तीन जिहादी दहशतवाद्यांना ठार केले, तर १२६ ओलिसांची सुटका केली. स्प्लेनडीड व कॅपुसिनो हॉटेल्समधील हल्ले संपले आहेत, पण हॉटेल वायबीआय येथे चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी सांगितले, की बुर्किनाबे येथे चार तारांकित स्प्लेनडीड व कॅपुसिनो रेस्टॉरंट येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अठरा देशातील २३ जण ठार झाले आहेत.
ही हॉटेल्स व रेस्टॉरंट संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी व परदेशी लोकांच्या पसंतीची आहेत. स्प्लेनडीड हॉटेलमधून बुर्किनाबेच्या सैन्याने १२६ जणांची सुटका केली त्यातील ३३ जण जखमी झाले आहेत.
या वेळी फ्रेंच विशेष दलांनीही कारवाईत भाग घेतला. या वेळी तीन दहशतवादी मारले गेले असून त्यात एक अरब व दोन कृष्णवर्णीय आफ्रिकींचा समावेश आहे. अंतर्गत सुरक्षामंत्री सिमॉन कॉमपावरे यांनी सांगितले, की स्प्लेनडीड व कापुसिनो हॉटेल्समधील हल्ले संपले आहेत, पण हॉटेल वायबीआय येथे चकमक सुरू आहे. एकूण वीस लोक ठार झाले असून ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंटच्या टेरेसवर १० मृतदेह सापडले आहेत. मृतांची एकूण संख्या कळलेली नाही. दळणवळणमंत्री रेमीस दांडजिनोवू यांनी सांगितले, की बुर्किनाबे सैन्याने फ्रेंच दलासमवेत ओलिसांना सोडवण्याचा प्रयत्न केला, कामगारमंत्री क्लेमंट सावाडोगो हे बचावले आहेत. आज सकाळी ऑगोडोगू येथील १४७ खोल्यांच्या हॉटेलमधून आगीच्या ज्वाळा दिसत होत्या व अनेकांच्या किंकाळय़ा ऐकू येत होत्या. रस्त्यावर दहा वाहने पेटवण्यात आली.
यानिक सावाडोगो यांनी सांगितले, की अतिशय भयानक असे ते दृश्य होते. अगदी जवळून ते लोकांना गोळय़ा घालत होते, रॅडिसन ब्लू या मालीतील बामको या राजधानीच्या शहरातील हॉटेलमध्ये जिहादींनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन महिन्यांतच हा हल्ला झाला असून, त्या वेळी १४ परदेशी व्यक्तींसह २० जण ठार झाले होते. तो हल्लाही अल कायदाशी संबंधित अतिरेक्यांनी केला होता.
श्वेतवर्णीय लक्ष्य
आजच्या हल्ल्यात श्वेतवर्णीय लोक जास्त प्रमाणात मारले गेले. अल कायदा इन द इस्लामिक मघरेब या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेताना म्हटले आहे, की फ्रान्स व अविश्वासू पाश्चिमात्यांचा आम्ही बदला घेत आहोत.