कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील तणावाची स्थिती कमी करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी खुद्द राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी शोपियांमध्ये सर्वसामान्य काश्मिरी जनतेशी संवाद साधला. त्यांच्या या भेटीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. “काश्मीरी जनतेला पैसे देऊन डोवाल त्यांची भेट घेत होते,” असा आरोप आझाद यांनी केला आहे. या वक्तव्यानंतर आझाद यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपाने नेते शाहनवाज हुसैन यांनी केली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार काश्मीरमधील सर्वसामान्य लोकांना भेटत आहेत, यावर पत्रकारांनी आझाद यांना प्रतिक्रिया विचारली त्यावर आझाद म्हणाले, “पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता. काश्मीरच्या जनतेवर कर्फ्यू लादून कायदा बनवण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.”

दरम्यान, आझाद यांच्या वक्तव्यावर भाजपाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे नेते शाहनवाज हुसैन म्हणाले, गुलाम नबी आझाद यांनी या वक्तव्यासाठी देशातील जनतेची माफी मागायला हवी. अशा विधानांचाच पाकिस्तान भारताविरोधात वापर करतो, काँग्रेसचे काही नेते पाकिस्तानची भाषा बोलता आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सर्वसामान्य काश्मीरी जनतेची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. काही ठिकाणी ते काश्मीरी जनतेसोबत जेवण करतानाही दिसून आले होते. डोवाल हे कलम ३७० हटवल्यापासून काश्मीरमध्येच आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि सीआरपीएफच्या जवानांचीही भेट घेतली होती.