आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया घालणाऱ्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला काहीसा धक्का देणारा प्रयोग वैज्ञानिकांनी यशस्वी केला असून त्यात विश्वाला पाच मिती असल्याचे गृहित धरण्यात आले आहे. पाच मितींच्या कृष्णविवराचे सादृश्यीकरण केले तर सापेक्षतावादाचा सिद्धांत कोलमडतो असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

केंब्रिज विद्यापीठ व लंडनचे क्वीन मेरी विद्यापीठ यांनी एका चकतीच्या आकारातील कृष्णविवराचे सादृश्यीकरण केले त्यात कालांतराने बारीक होणाऱ्या सूत्रांच्या मदतीने फुगवटय़ासारखे भाग निर्माण केले होते. कालांतराने हे सूत्र म्हणजे दोऱ्यासारखे घटक इतके बारीक झाले की, त्यांचे लहान कृष्णविवरात रूपांतर झाले. नळातून बाहेर येणारे पाणी थेंबाच्या रूपात बाहेर येते तसेच हे होते. चकतीच्या आकाराच्या कृष्णविवरांचा शोध भौतिकशास्त्रज्ञांनी २००२ मध्ये सैद्धांतिक पातळीवर लावला आहे. पण त्यांची गुणवैशिष्टय़े महासंगणकाच्या मदतीने निर्माण करण्यात आली. या प्रकारची कृष्णविवरे निव्वळ एकत्व निर्माण करतात का, असा प्रश्न होता कारण त्यामुळे सापेक्षतावादाचा सिद्धांत कोलमडून पडणार होता. सापेक्षतावादाच्या सिद्धांताप्रमाणे कुठलेही द्रव्य त्याच्या सभोवतालच्या अवकाश व काल या मितींना ताण देत वाकवते व तो गुरूत्वाचा परिणाम असतो.

आइन्स्टाइनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडल्यानंतर आतापर्यंत शंभर वर्षे असे मानले जाते की, सापेक्षतावाद अनेक कसोटय़ात खरा सिद्ध झाला आहे पण त्यात एकत्वाच्या अस्तित्वाची मर्यादा आहे. एकत्व हा असा बिंदू असतो जिथे गुरुत्व खूप जास्त असते तेथे अवकाश, काळ व भौतिकशास्त्राचे नियम मोडून पडतात. सापेक्षतावादानुसार एकत्व हे कृष्णविवरांच्या केंद्रस्थानी असते व त्यामुळे तेथे न परतण्याचा एक बिंदू येतो, तेथे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की, त्यातून एकही वस्तू बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे कृष्णविवराचे बाहेरून निरीक्षण करता येत नाही. जोपर्यंत एकत्व हे बदल घडवत नाही तोपर्यंत सापेक्षतावादाचा सिद्धांत टिकतो. कॉस्मिक सेन्सॉरशिप काँजेक्चरच्या सिद्धांतानुसार हे घडते, असे केंब्रिजच्या उपयोजित गणित व सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे विद्यार्थी मार्कस कुनसेश यांनी सांगितले. जर एकत्व परिप्रेक्ष्याच्या बाहेर असेल तर ते बाहेरून दिसेल व एखादा पदार्थ अनंत घनतेच्या विवरात कोसळल्याचे समजेल त्यामुळे भौतिकशास्त्राचे सारे नियम मोडून पडतील.

’सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञांच्या मते केवळ एकत्व असणारी अंगठीसारखी रचना असते व तिला जास्त मिती असतात. जर तसे असेल तर सापेक्षतावादाचा सिद्धांत टिकत नाही असे सारन तुन्यावुनाकूल यांनी सांगितले.

’जर सापेक्षतावाद कोलमडला तर त्यामुळे सगळे आकलनच उलटेपालटे होईल व आपण कशाचेच भाकित करू शकणार नाही त्यामुळे सापेक्षतावाद हा विश्वाच्या आकलनाचा एकमेव सिद्धांत नाही. फिजीकल रिव्ह्य़ू जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.