ओटावा : कॅनडामधील शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणासह कॅनडामधील गुन्हेगारी जगताशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नाव जोडण्याचे वृत्त चुकीचे आणि काल्पनिक असल्याचे कॅनडाने म्हटले आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तवार्ता सल्लागार नथाली ड्रौइन यांनी या वृत्ताचे खंडन केले. राष्टीय सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा दाखला देऊन ‘द ग्लोब अँड मेल’ वृत्तपत्राने संबंधित वृत्त प्रसिद्ध झाले होते. या अधिकाऱ्याचे नाव वृत्तात दिले नव्हते.

हेही वाचा >>> Naxalites Killed In Encounter : छत्तीसगडमध्ये १० नक्षलवादी ठार

या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निज्जर हत्येसह इतर कटांची माहिती होती, असे कॅनडातील सुरक्षा यंत्रणांना खात्रीने वाटत होते. कॅनडा आणि अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने या हत्याकटात अमित शहा आणि डोवाल, जयशंकर यांचेही नाव घेतले. या वृत्तावर आक्षेप घेऊन भारताने तीव्र शब्दांत खंडन केले.

‘रॉयल कॅनडिअन माउंटेड पोलीस’ (आरसीएमपी) आयुक्त माइक दुहेमे यांनी १४ ऑक्टोबर रोजी कॅनडामध्ये पसरत चाललेल्या हिंसेला भारतातील एजंट्स जबाबदार असल्याचा दावा केला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही नंतर आक्षेपार्ह विधाने केली होती. कॅनडाचे उपपरराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी कॅनडामधील शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याचे आदेश दिल्याचे वक्तव्य केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारकडे कुठलाही पुरावा नाही

कॅनडाच्या ‘प्राइव्ही काउन्सिल ऑफिस’ने निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार, ‘१४ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि इतर अधिकाऱ्यांनी कॅनडातील गुन्हेगारीबद्दल जाहीर वक्तव्ये आणि आरोप केले. भारतातील एजंट्सचा यात सहभाग असल्याचे सांगितले गेले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्या कॅनडामधील गुन्हेगारी जगताच्या कथित संबंधांविषयी कॅनडाच्या सरकारने काहीही निवेदन केलेले नाही किंवा तसा कुठलाही पुरावा सरकारकडे नाही. यासंबंधीचे वृत्त काल्पनिक आणि चुकीचे आहे.’