फेसबुकवर अपलोड केलेला सेल्फी तरुणीचा हत्येचा गुन्हा सिद्ध करण्यास पुरेसा ठरला आहे. क्षुल्लक कारणावरुन मैत्रिणीची गळा आवळून हत्या करणाऱ्या शायॅन रोज अनत्वॉनला (२१) न्यायालयाने दोषी ठरवले असून या हत्येप्रकरणी तिला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

कॅनडातील सास्काटून येथे मार्च २०१४ मध्ये ब्रिटनी गारगोल या तरुणीचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला अनत्वॉनने ब्रिटनी पबला गेल्याचे सांगितले. काकांच्या घरी जायचे असल्याने मी तिथून लवकर निघाली, पण ब्रिटनी पबमध्येच होती असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही याच दिशेने तपास सुरु करत ब्रिटनी कोणासोबत गेली होती का याचा तपास सुरु केला.

ब्रिटनीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक पट्टा सापडला होता. याच पट्ट्याच्या मदतीने तिचा गळा आवळण्यात आला होता. हत्येच्या काही तासांपूर्वी ब्रिटनी आणि अनत्वॉनने फेसबुकवर एक सेल्फी अपलोड केला होता. या सेल्फीत अनत्वॉनने जो पट्टा घातला होता तो पट्टा आणि ब्रिटनीच्या मृतदेहाजवळील पट्टा एकच असल्याचे समोर आले. या आधारे पोलिसांनी अनत्वॉनला अटक केली आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली. नुकताच कोर्टाने या खटल्यात निकाल दिला आहे. न्यायालयाने अनत्वॉनला सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ‘त्या दिवशी मी आणि ब्रिटनी घरी पार्टी करत होतो. आम्ही नशेत होतो. यानंतर आमच्यात वाद झाला आणि मी तिची हत्या केली. मात्र हत्या नेमकी कशी केली हे मला आठवत नाही’ असे तिने न्यायालयात सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.