खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप केल्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले होते. परंतु, भारतासोबत संबंध जोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलं आहे. कॅनडाच्या नॅशनल पोस्ट वृत्तस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

जगभरात भारताचा प्रभाव वाढत असल्याने ट्रुडो म्हणाले की, “कॅनडा आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी भारतासह संलग्न राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.” गुरुवारी मॉन्ट्रिअल येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना ट्रुडो म्हणाले की, “जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढत आहे. त्यामुळे कॅनडा आणि मित्र राष्ट्रांनी रचनात्मक आणि गांभीर्याने सहभाग घेणं महत्त्वाचं आहे. भारत एक वाढती आर्थिक शक्ती आणि महत्त्वाचा राजकीय खेळाडू आहे. इंडो पॅसिफिक रणनीतीनुसार भारताशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्याबाबत आम्ही खूप गंभीर आहोत”, असंही ते म्हणाले.

“कायद्याचे राज्य म्हणून आम्हाला या प्रकरणाची संपूर्ण तथ्ये मिळतील याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे भारताने कॅनडासोबत काम करणे आवश्यक आहे”, असंही ट्रुडो म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निज्जरच्या हत्येप्ररकणी अमेरिका कॅनडाच्या बाजूने उभी राहील असं पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना वाटलं होतं. अमेरिकेचे मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करतील असं ट्रुडो यांना वाटलं होतं. परंतु, एस जयशंकर यांच्या भेटीनंतर ब्लिंकन यांनी केलेल्या निवेदनात निज्जर आणि कॅनडाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.