Canadian Vlogger Instagram Post About India: कॅनडातील एका पर्यटकाने नुकतीच भारताला भेट दिली होती. या भारत भेटी दरम्यान त्याने देशातील विविध भागांत तब्बल पाच आठवडे प्रवास केला. यानंतर विल्यम रॉसी नावाच्या या पर्यटकाने इन्स्टाग्रामवर त्याचा भारात भेटीचा अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, “मी भेट दिलेल्या ३७ देशांपैकी भारतातील अनुभव सर्वात धक्कादायक होते.”

या पोस्टमध्ये पर्यटकाने त्याला भारतात प्रवास करताना शिकायला मिळालेल्या धक्कादायक धड्यांचाही उल्लेख केला आहे. कॅनेडियन पर्यचाकाच्या या पोस्टनंतर त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

“तुम्ही ज्या गोष्टी पाहता, ऐकता, त्यांचा वास घेता आणि त्याची चव घेता त्या तुम्हाला अशा प्रकारे विचार करायला, जाणवायला आणि वागायला लावतील याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल,” असे या कॅनेडियन पर्यटकाने लिहिले आहे.

यावेळी त्याने स्पष्ट केले की तो भारतात राहण्याचा निर्णय घेणार नाही, परंतु त्याने दावा केला की, या प्रवासामुळे त्याला जीवनाचे असे धडे शिकायला मिळाले ज्याची त्याला आवश्यकता असल्याची कल्पना नव्हती.”

या पोस्टमध्ये कॅनेडियन पर्यटकाने त्याच्या भारत प्रवासातील काही गोष्टींचा सारांश देणारे काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “डोक्यावरील छप्पर आणि खायला अन्न मिळत असल्याबद्दल पुरेशी कृतज्ञता दाखवली जात नाही.” याचबरोबर त्याने भारतीय मसाले आणि ताजमहाचले कौतुक केले आहे. त्याने म्हटले की, “ताजमहालला कमी लेखले जाते. पण, वास्तविकपणे तो १०० पट जास्त सुंदर आहे.” तसेच भारतीय लोक मैत्रीपूर्ण आणि उत्साही असल्याचेही म्हटले आहे.

दरम्यान, या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक युजर्सना असे वाटले की, हा कॅनेडियन पर्यटक भारतात असलेल्या गोंधळ आणि आकर्षणाबद्दल प्रामाणिक आहे, तर काहींना असे वाटले की त्याचे मत मर्यादित आहे आणि देशाचे खरे सार त्याला कळाले नाही.

“मित्रपूर्वक लोक आणि उत्तम वास्तुकला (ताजमहाल) – बस एवढेच? माफ कर तुला भारताची सकारात्मक बाजू अनुभवण्याचे भाग्य लाभले नाही. तसेच, तू जे धडे शिकला म्हणता ते न्यू यॉर्कला भेट देऊनही शिकता आले असते. त्यासाठी जगभर प्रवास करण्याची गरज नाही,” असे एका युजरने म्हटले.