गेल्या तीन आठवड्यांपासून पंजाबमध्ये सुरू असलेलं राजकीय नाट्य अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीय. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी १८ सप्टेंबर रोजी पदाचा राजीनामा दिल्यापासून या वादाला सुरूवात झाली. आज काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरिष रावत यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर उलट टिप्पणी केल्यामुळे अमरिंदर सिंग यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मनातली खदखद बोलून दाखवली आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकीय कलहनाट्य कोणत्या दिशेला जातेय, याकडे सर्वच देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या सगळ्या वादात पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यामुळे देखील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अमरिंदर सिंग यांच्यावर दबाव?

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांनी दुपारी प्रतिक्रिया देताना अमरिंदर सिंग यांच्यावर कुठलातरी दबाव असल्याचं म्हटलं होतं. “काँग्रेसकडून अमरिंदर सिंग यांचा अपमान झाल्याच्या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नाही. अमरिंदर सिंग यांनी नुकत्याच केलेल्या काही विधानांवरून तसं जाणवत आहे. त्यांनी या सगळ्याचा पुनर्विचार करायला हवा आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत होईल, असं काहीही करू नये”, असं हरीश रावत यांनी म्हटलं आहे.

“तो अपमान नव्हता तर काय होतं?”

मात्र, हरीश रावत यांच्या या विधानामुळे अमरिंदर सिंग चांगलेच भडकले आहेत. “माझा झालेला अपमान आख्ख्या जगानं पाहिला आहे. तरी देखील हरीश रावत याच्या उलट दावे करत आहेत. हा जर अपमान नव्हता, तर काय होतं?” असा सवाल कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला आहे.

“…तर सिद्धूला मोकळीक का देण्यात आली?”

“जर माझा अपमान करण्याचा किंवा मला वाईट वागणूक देण्याचा पक्षाचा हेतू नव्हता, तर मग कित्येक महिने नवजोत सिंग सिद्धूला माझ्यावर खुलेपणाने सोशल मीडिया आणि इतर सार्वजनिक ठिकाणी टीका करण्याची मोकळीक का देण्यात आली? सिद्धूच्या नेतृत्वाखालील बंडखोरांना माझ्या अथॉरिटीला कमी लेखण्याची मोकळीक का देण्यात आली?” असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी आंदोलनावर चर्चा झाली असून तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आपण पंतप्रधानांना केल्याची माहिती चरणजीत सिंग चन्नी यांनी दिली आहे.