वृत्तसंस्था, श्रीनगर, नवी दिल्ली

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटप्रकरणी काश्मीरमधील अमीर रशीद अली याला नवी दिल्लीतून अटक केल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी दिली. हल्ल्यात वापरण्यात आलेली ह्युंदाई आय२० ही कार अमीरच्या नावावर नोंदवलेली होती. त्याच्यावर डॉ. उमर नबीबरोबर स्फोटाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. डॉ. नबीने हा आत्मघातकी स्फोट घडवल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

दिल्लीत १० नोव्हेंबरला सायंकाळी ७च्या सुमाराला झालेल्या या स्फोटाचा तपास ‘एनआयए’कडून केला जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधील पंपोरातील संबूरा येथील रहिवासी असलेल्या अमीरने उमर उन नबी याच्या साथीने हल्ला घडवून आणण्याचा कट रचला होता, असे तपासातून समोर आल्याचे ‘एनआयए’ने सांगितले.

अमीर कार खरेदी करण्यासाठी दिल्लीला आला होता. ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस’ची (आयईडी) वाहतूक करण्यासाठी या कारचा वापर करण्यात आला. डॉ. नबीशी संबंधित आणखी एक वाहन ‘एनआयए’ने यापूर्वीच जप्त केले आहे. स्फोटातील पुरावा म्हणून या कारची तपासणी करण्यात येत आहे.

याबरोबरच, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. आदिल आणि डॉ. मुझफ्फर गेनी या दोघांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी दक्षिण काश्मीरमधील काझीगुंड येथील जासीर उर्फ डॅनिश या राज्यशास्त्रातील पदवीधर तरुणाला ताब्यात घेतले. उमरने त्याला आत्मघाती हल्लेखोर बनविण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केल्याची माहिती आहे.

नौगाम स्फोट न्यायवैद्यक त्रुटीमुळे

श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्थानकात शुक्रवारी रात्री उशिरा झालेला अपघाती स्फोट हा न्यायवैद्यक पथकाने स्फोटके तपासताना प्रकाशाचा जास्त वापर केल्यामुळे झाला असावा, असा अंदाज प्राथमिक तपासातून व्यक्त करण्यात आला आहे. ही दहशतवादी घटना नव्हती, असेही रविवारी स्पष्ट करण्यात आले. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. सूत्रांनी सांगितले, की जप्त करण्यात आलेल्या स्फोटक सामग्रीच्या काही बॉक्समध्ये ॲसिटोफिनोन, हायड्रोजन पेरॉक्साइड, सल्फ्युरिक ॲसिड यांचे एकत्रित द्रव स्वरुपातील रसायन होते. हे द्रव स्वरुपातील रसायन तपासण्यासाठी प्रकाशाची तीव्रता वाढवणे आवश्यक असते. तो वाढविल्यामुळे मोठा स्फोट झाला असावा.

आत्मघाती स्फोटासाठी वर्षभरापासून तयारी

नवी दिल्ली : दिल्लीमधील स्फोट घडविण्यासाठी उच्चशिक्षितांचे दहशतवाद्यांचे प्रारूप गेल्या वर्षभरापासून आत्मघाती हल्लेखोराचा शोध घेत होते. डॉ. उमर नबी ही सारी सूत्रे चालवीत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अटक करण्यात आरोपींच्या चौकशीतून डॉ. उमर हा जहाल मूलतत्त्ववादी असल्याचे समोर आले आहे.

लाल किल्ल्याजवळ सापडलेल्या काडतुसांचा तपास

लाल किल्ल्याजवळील ढिगाऱ्यात सापडलेल्या ‘९एमएम’ बंदुकीच्या तीन काडतुसांचा सुरक्षा संस्था तपास करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी रविवारी दिली. स्फोट झालेल्या ह्युंदाई आय२० कारजवळ सापडलेल्या काडतुसांपैकी एक रिकामे आणि दोन जिवंत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘९एमएम’ बंदुकीचा नागरी कारणासाठी वापर करण्याची परवानगी नाही. ही काडतुसे केवळ विशेष पथके किंवा विशेष परवानगीने स्वतंत्र व्यक्तींना दिली जातात. ही काडतुसे तेथे कशी पोहोचली याचा शोध घेतला जात आहे.