Case against IIT Baba over ganja possession : उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात चांगलेच चर्चेत आलेले अभय सिंह म्हणजेच आयआयटी बाबा यांना जयपूर पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांच्याविरूद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय सिंह हे इंडियन इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बे येथून शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांना महाकुंभमेळ्यात आयआयटी बाबा म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

पोलिसांना आयआयटी बाबा रिद्धी सिद्धी भागातील हॉटेलमध्ये उतरले असून तेथे ते गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना बाबांकडून गांजा आढळून आला, मात्र गांज्याचे प्रमाण अत्यल्प होते.

आढळलेल्या गांजाचे प्रमाण परवानगीच्या मर्यादेत असल्याने पोलि‍सांनी त्यांना काही वेळासाठी ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिले, असे पोलि‍सांनी सांगितले. पोलि‍सांनी सुटका केल्यानंतर अभय सिंह यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांच्याकडे आढळलेला गांजा हा प्रसाद असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी देखील त्यांनी केली.

आयआयटी बाबांचं म्हणणं काय?

“हॉटेलात मी राहत होतो तेथे पोलीस पोहचले आणि मी गोंधळ घालत असल्याचे सांगून त्यांनी मला ताब्यात घेतले. मला वाटतं की हे एक विचित्र कारण होतं. कुंभमधील जवळपास प्रत्येक बाबा प्रसाद म्हणून गांजा घेतात, ते त्या सर्वांना अटक करणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान आयआयटी बाबाने पोलिसांच्या चौकशीदरम्यान दावा केला की तो आघोरी बाबा आहे आणि प्रथेनुसार गांजा सेवन करतो.

आयआयटी बाबा अभय सिंग हे आयआयटी-मुंबईचे माजी विद्यार्थी आणि माजी एरोस्पेस अभियंता आहेत. शैक्षणिक क्षेत्रात चांगले यशानंतर मिळाल्यानंतर ते सोडून अध्यात्माचा मार्ग निवडल्याबद्दल महाकुंभमेळ्यात त्यांची चांगलीच चर्चा झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआयटी बाबा यांचे इंस्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान कुंभमध्ये त्यांची एक मुलाखत व्हायरल झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून हे बाबा वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत राहिले आहेत.