‘हिंदू दहशतवादा’चा मुद्दा आपल्या लेखात मांडल्यामुळे अभिनेता कमल हसनच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण याप्रकरणी आता पोलिसांनी कमल हसनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंडियन पिनल कोडच्या कलम ५००, ५११, २९८, २९५ (अ) आणि कलम ५०५ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहे.

पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत, पण आताचे हिंदू हिंसेत सहभागी होतात असे म्हणत लोकांचा ‘सत्यमेव जयते’ वरील विश्वास उडत चालल्याचे कमल हसन यांनी त्यांच्या लेखात लिहिले. इतकेच नाही तर हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्या लेखात केली. कमल हसन यांनी त्यांच्या लेखात केरळ सरकारचे कौतुकही केले. तसेच केरळ सरकारने तामिळनाडूच्या तुलनेत धार्मिक हिंसाचाराचा प्रश्न चांगल्या प्रकारे हातळल्याचेही लेखात नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमल हसन यांच्या लेखावर भाजपने कडाडून टीका केली. कमल हसन यांच्यासारख्या परिपक्व अभिनेत्याने मांडलेले विचार अत्यंत अपरिपक्व आहेत असे भाजपने म्हटले आहे. कमल हसन यांनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे अशी टीका भाजप नेते विनय कटियार यांनी केली. केरळमध्ये मुस्लिम दहशतवादी संघटना सक्रिय असतानाच कमल हसन यांनी अशा प्रकारचा लेख का लिहिला? हिंदू दहशतवादाचा मुद्दा त्यांना आत्ताच समोर का आणावासा वाटला? असे प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केले. तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी तर कमल हसन यांची तुलना थेट दहशतवादी हाफिज सईदसोबत केली आहे. ‘आनंद विकटन’ या तामिळ साप्ताहिकात कमल हसन यांनी लेख लिहिला.