तो एक चोर आहे. मात्र, पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. तो चोर आहे, पण तरीही जेव्हा तो खरेदी करतो, तेव्हा सुट्टे पैसे कधीच परत घेत नाही. त्याला मोठमोठ्या मॉल्समध्ये चोरी करताना तब्बल दहा वेळा पकडण्यात आलं आहे. पण तरीही त्याच्याविरोधात कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. का? कारण हा चोर आहे अवघ्या सहा वर्षांचा.

इंडिया टुडेने याविषयीचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या सहा वर्षांच्या चोराला पोलिसांनी तब्बल दहा वेळा पकडलेलं आहे. हा मुलगा आहे उत्तरप्रदेशातला. उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज भागामध्ये जेव्हा मॉल्समध्ये वारंवार चोरी होण्याच्या घटना समोर आल्या त्या वेळी त्या घटनांचा तपास करताना पोलिसांना हा मुलगा तिथं असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून आढळून आलं. तो अनेकदा पकडलाही गेला आहे आणि जेव्हा जेव्हा तो पकडला जातो, तेव्हा तेव्हा त्याच्या खिशात नोटांचं मोठं बंडल सापडतं.

ज्यांच्याकडे चोरी झालेली आहे, ते लोकही या चिमुरड्याकडे पाहून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करणं टाळतात. त्याला आत्तापर्यंत दहा वेळा पकडण्यात आलं आहे, मात्र त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी त्याच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून अनेकदा ताकीद दिली आहे, पण तरीही हा मुलगा मॉल्स आणि दुकानांमधून चोरी करतच असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा जेव्हा एखाद्या दुकानातून खरेदी करतो, तेव्हा परत आलेले सुट्टे पैसे तो कधीच स्वीकारत नाही. तो ते पैसे टीप म्हणून त्या दुकानदारालाच देतो, मग ती रक्कम कितीही असूदे!