ब्राझीलमधील एम्ब्रेअर या कंपनीकडून संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला (डीआरडीओ) हवाई टेहळणीसाठी २०८ दशलक्ष डॉलर खर्चून पुरविण्यात आलेल्या तीन विमानांच्या व्यवहारात मध्यस्थाला दलाली देण्यात आल्याचा आरोप केला जात असून त्याप्रकरणी सीबीआयने प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे.

ब्राझीलच्या सदर कंपनीने या व्यवहारासाठी मध्यस्थाची मदत घेतली या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या संदर्भाच्या अनुषंगाने सीबीआयने संरक्षण दलातील अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दलाली दिल्याचे आरोप करण्यात आले असून त्याला पुष्टी देणारा पुरेसा पुरावा तक्रारीत नसल्याने सीबीआयने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

प्राथमिक चौकशी सुरू केल्यानंतर सीबीआयने विविध संबंधितांची चौकशी केली आणि याबाबतचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर संशयितांविरुद्ध एफआयआर नोंदविला जाणार आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान सीबीआयला जबानी नोंदविता येत नाही अथवा छापे टाकता येत नाहीत.भारत आणि सौदी अरेबियाला विमाने पुरविण्याबाबतचा करार व्हावा यासाठी एम्ब्रेअरने मध्यस्थाची मदत घेतली असे वृत्त ब्राझीलमधील एका वृत्तपत्राने दिल्यानंतर दलाली देण्यात आल्याचा आरोप उघड झाला. भारतातील संरक्षण खरेदी व्यवहारामध्ये नियमानुसार मध्यस्थावर कटाक्षाने बंदी घालण्यात आली आहे. ब्राझीलमधील ‘फोल्हा दे साओ पावलो’ या अग्रगण्य वृत्तपत्राने गेल्या आठवडय़ात दिलेल्या वृत्तपत्रात म्हटले आहे की, एम्ब्रेअरने भारतासमवेतचा करार करण्यासाठी इंग्लंडस्थित एका संरक्षणविषयक दलालास दलाली दिली.