माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना झालेली सीबीआय अटक ही मोठी कारवाई आहे. वारंवार संधी देऊनही ते खोटे बोलत राहिल्याने त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे, असे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या अटकेवर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे.


सर्व पुरावे कार्ती चिंदबरम यांच्या विरोधात जात असतानाही ते वारंवार सीबीआयशी खोटे बोलत राहिले. त्यामुळे त्यांच्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली, त्यामुळे आता त्याचे तुरुंगात जाणे निश्चित झाले असून सीबीआय लवकरच त्यांच्यावर आरोपपत्र देखील दाखल करेल असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने बुधवारी सकाळी कार्ती चिंदबरम यांना चेन्नईतील विमानतळावरुन ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कार्ती चिदंबरम यांच्यावरील कारवाईने मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. मोदी सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला २००७ मध्ये नियमापेक्षा अधिक परकीय गुंतवणूक मिळाल्यानंतर ते कायद्याच्या कचाट्यात सापडू नयेत यासाठी कार्ती चिदंबरम यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या मदतीने नियम वाकवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने मे २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला होता. पी. चिदंबरम केंद्रात मंत्री असताना नियमबाह्य परकीय गुंतवणूक केलेल्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला कार्ती यांनी मदत केली आणि त्या मोबदल्यात स्वतःच्या बेनामी कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतल्याचा आरोप होता.

गुन्हेगारी स्वरुपाची फसवणूक करणे, बेकायदा पद्धतीने लाभ घेणे, सरकार अधिकाऱ्यांवरील प्रभावाचा गैरफायदा घेणे या कलमांखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा देखील टाकला होता. बुधवारी सकाळी कार्ती चिदंबरम लंडनमधून परतताच चेन्नई विमानतळावरुन सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वीच कार्ती चिदंबरम यांच्या सीएलाही सीबीआयने अटक केली होती.