नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी सकाळी ११ वर्षे जुन्या एका आरोपाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या घराची झडती घेतल्याने त्यांच्या बचावासाठी काँग्रेस पुढे सरसावली आहे. पी. चिदंबरम हे देशभक्त असून त्यांच्या राष्ट्रनिष्ठेवर कुणीही अविश्वास दर्शवू शकत नाही, असे काँग्रेसच्या दूरसंपर्क विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

एक वीज कंपनीसाठी २६३ चिनी नागरिकांना व्हिसा प्राप्त करून दिल्याचा आरोप पी. चिदंबरम आणि कीर्ती चिदंबरम यांच्यावर करण्यात आलेला आहे.  २०१०-११ या काळात चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना हा आरोप करण्यात आला होता. मात्र या आरोपाला ११ वर्षे झाल्यानंतर सीबीआयने मंगळवारी पी. चिदंबरम आणि कीर्ती चिदंबरम यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले.

चिदंबरम यांच्या निवासस्थानी छापे मारल्याने काँग्रेसने सीबीआयवर टीका केली.

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांच्यावर करण्यात आलेले हास्यास्पद आरोप म्हणजे राजकारणाची पातळी किती हीन झाली आहे, हे दर्शवते, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.

काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, ‘‘काँग्रेस पक्ष पूर्णपणे चिदंबरम यांच्या पाठिशी उभा राहाणार आहे. केवळ चिदंबरम यांना त्रास देण्यासाठी आणि वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ही छापेमारी केली जात आहे, असा आरोप माकन यांनी केला.

इतकी वर्षे काय केले- चिंदंबरम

‘‘सीबीआयने चेन्नई आणि दिल्लीतील माझ्या निवासस्थानी छापे टाकले. सीबीआयच्या पथकाने मला एफआयआरची प्रती दाखवली त्यात माझे आरोपी म्हणून नाव नव्हते. या पथकाला माझ्या घरी काहाही मिळाले नाही आणि त्यांनी काहीही जप्त केले नाही,’’ असे पी. चिदंबरम यांनी ट्वीट केले आहे. चिदंबरम यांनी सीबीआयच्या छाप्यांच्या वेळेबाबतही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ‘‘मी २०१०-११ या वर्षी गृहमंत्री होतो आणि आता २०२२ वर्ष सुरू आहे. या १२ वर्षांत ते काय करत होते, असा प्रश्न चिदंबरम यांनी विचारला.