अनिकेत विश्वासराव

लहानपणी आमच्या घराला अंगण असल्याने आम्ही अंगणात बॉक्स क्रिकेट खेळायचो. पुढे शाळेत जाऊनसुद्धा क्रिकेटची आवड मी कायम जोपासली. पण महाविद्यालयात गेल्यावर मात्र अभिनयाची गोडी क्रिकेटहून काहीशी अधिक लागली, तरीही वेळ मिळेल तेव्हा क्रिकेट खेळणे चुकवले नाही. अभिनयक्षेत्रात काम करताना सेलेब्रिटी लीग सुरू झाली, त्यातही मला सहभागी होता आले. क्रिकेट हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयाजवळ असल्याने प्रत्येकाच्या त्याविषयीच्या संकल्पना आणि दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणूनच कदाचित क्रिकेट पाहायला अजून मजा येते. लहानपणी बाबा मला ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना पाहायला घेऊन गेले होते आणि ते भव्य मैदान पाहात राहिलो होतो. काही वर्षांपूर्वी भारताचा कसोटी सामना पाहण्यासाठी मी लंडन येथील लॉर्ड्स स्टेडियमवर गेलो होतो आणि तेव्हा भारत विजयी झाला होता. लहानपाणी पाहिलेले ब्रेबॉर्न आणि लंडनमधील कसोटी सामना माझ्या कायम लक्षात राहणारा आहे. २ एप्रिल, २०११ला मी माझ्या नव्या घरी राहायला गेलो आणि याच दिवशी विश्वचषकाचा अंतिम सामना होता. त्यानिमित्ताने माझ्या घरी सर्वाना आमंत्रण दिले होते. मोठय़ा स्क्रीनवर सामना पाहात सर्वानी धमाल केली होती. माझे नवे घर आणि भारताचे विश्वविजेतेपद कायम स्मरणात राहणारे ठरले.

(शब्दांकन : नीलेश अडसूळ)