आर्थिक सर्वसमावेशकता हे आमचे मुख्य उद्दीष्ट असून, केंद्र सरकार हे देशातील नागरिकांचे मुख्यत्वे दलितांचे सक्षमीकरण करणारे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दलित उद्योजकांच्या ‘दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ संमेलनाच्या उदघटनावेळी ते बोलत होते. दलितांनी आजवर वेळोवेळी अपमान सहन केला आहे. दलितांना उद्योग सुरू करताना कर्ज मिळविण्यासाठी भरपूर खस्ता खाव्या लागतात, असेही मोदी म्हणाले. केंद्र सरकार हे ‘आपकी सरकार’ (जनतेचे सरकार) असल्याचे सांगत मोदींनी दलितांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे म्हटले.
आर्थिक सर्वसमावेशकता हे मुख्य उद्दीष्ट समोर ठेवून सरकार काम करत आहे. आम्हाला रोजगार शोधणारे नाही, रोजगार उपलब्ध करुन देणारे स्त्रोत निर्माण करायचे आहेत. औद्योगिकीकरण देशातील दलित बंधू-भगिनींना रोजगार उपलब्ध करून देईल, असे अतिशय योग्य भाकित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. औद्योगिकीकरणाचा सर्वात जास्त फायदा देशातील दलित बंधू-भगिनींना होईल यात शंका नाही, असे देखील मोदी म्हणाले.