पृथ्वीभोवती असलेल्या अवकाश कचऱ्यात प्रचंड वाढ होत असून आगामी अवकाश मोहिमांमध्ये अन्य आव्हानांपेक्षा हा अडथळा सर्वात मोठ्ठा असेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आजवर हवामान बदल, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना होणारे घर्षण किंवा विविध प्रकारची बले अशा आव्हानांचा सामना अवकाश मोहिमांना करावा लागे, मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले असून वाढत्या कचऱ्यामुळे या साहसी मोहिमांना ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत.
कचरा मग तो कोठलाही असो, तो सामावून घेण्याची एक कमाल मर्यादा असते. आजवर अनेक देशांनी आखलेल्या प्रचंड महत्त्वाकांक्षी अवकाशमोहिमांदरम्यान मोठय़ा प्रमाणावर कचरा निक्षेपित केला गेला आहे. आणि अवकाशातील कचरा साठवणुकीच्या क्षमतेने कमाल मर्यादा गाठली आहे, असा दावा युरोपीय अवकाश संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
सध्या शास्त्रज्ञांनी केलेल्या मोजणीनुसार एका कॉफीकपच्या आकारइतक्या १७००० ‘अवकाश वस्तू’ अंतराळात फिरत आहेत. अशावेळी प्रचंड वेगाने अंतराळात पाठविलेल्या अवकाशयानाला एखादा खिळा जरी लागला तरी तो फटका एखाद्या हस्तध्वमाच्या (हँडग्रेनेड) तीव्रतेइतका बसू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
या समस्येवर मात करण्यासाठी अवकाश संस्थेतर्फे एक विशेष वाहन तयार करण्यात येत आहे. ‘हंटर कीलर प्रोब’ असे त्या वाहनाचे नाव असून उपग्रहांना मारक ठरू शकणाऱ्या वस्तूंना उध्वस्त करण्याचे काम हे वाहन करेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला, मात्र त्याचवेळी अवकाश कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

धोक्याचा इशारा
सध्या पृथ्वीभोवती असलेल्या कचऱ्याच्या – डेब्रीजच्या प्रमाणात प्रचंड वेगाने वाढ होत आहे. हा वेग असाच कायम राहिला तर अवकाशातील विविध प्रकारच्या टक्करींच्या संख्येत तब्बल २५ टक्क्य़ांनी वाढ होईल, असा धोक्याचा इशारा या शास्त्रज्ञांच्या चमूने दिला आहे. आणि असे घटलेच तर पृथ्वीच्या नजीक असलेल्या आवरणांमध्ये अवकाश मोहिमा राबविणे निव्वळ अशक्य होऊ शकते.