आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या एका विधानावरून सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का?” असा प्रश्न आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी विचारला होता. या विधानावर काँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून आता त्यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भाजपावर टीका केली आहे. “हे भाजपाचे संस्कार आहेत का?” असा सवाल करतानाच चंद्रशेखर राव यांनी हेमंत बिस्व शर्मा यांना बडतर्फ करण्याची देखील मागणी केली आहे.
“माझी मान शरमेनं झुकली आहे”
हैदराबादमधील रायगिरीमध्ये एका जाहीर सभेत बोलताना चंद्रशेखर राव यांनी भाजपावर तोफ डागली आहे. “पंतप्रधान मोदीजी, हे भाजपाचे संस्कार आहेत का? हा आपला हिंदू धर्म आहे का? ही आपल्या देशाची संस्कृती आहे का? एका नेत्याला तुमचे मुख्यमंत्री तुमचे वडील कोण आहेत? असा प्रश्न विचारत आहेत. माझी मान शरमेनं झुकली आहे. माझ्या डोळ्यांत पाणी येत आहे. या देशासाठी ही बाब चांगली नाही”, असं राव म्हणाले आहेत.
“एका खासदाराविषयी तुमच्या पक्षाचे एक मुख्यमंत्री तुम्ही कोणत्या वडिलांच्या पोटी जन्म घेतला? असं बोलू शकतात का? हे आपले संस्कार आहेत का? वेद, भगवदगीता, महाभारत, रामायणामधून आपल्याला हेच शिकवलं आहे का? नाही”, अशा शब्दांत चंद्रशेखर राव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“हिंदू धर्माला विकून त्यावर…”
दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रशेखर राव यांनी भाजपावर हिंदु धर्माच्या मुद्द्यावरून देखील निशाणा साधला. “हिंदू धर्माला विकून त्याच्या नावावर मतं कमावणारे तुम्ही वाईट लोक आहात. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डांना मी विचारेन की हे आपले संस्कार आहेत का? जर तुम्ही इमानदार असाल, धर्म मानणारे असाल तर आसामच्या मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करा. सहनशीलतेची देखील एक सीमा असते”, असं ते म्हणाले.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटिझन्सनी लागलीच चंद्रशेखर राव यांचा राहुल गांधींवर टीका करतानाचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणाले होते हेमंत बिस्व शर्मा?
उत्तराखंडमधील एका प्रचारसभे १२ फेब्रुवारी रोजी हेमंत बिस्व शर्मा यांनी हे विधान केलं आहे. “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का? आपल्या देशाच्या लष्कराने पाकिस्तानात बॉम्ब फोडला असे म्हटले तर ते फोडलेच आहेत,” असे हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले. “त्यांची मानसिकता पाहा, देशाचा अभिमान, जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. त्यावर राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत”, असं ते म्हणाले होते.