भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी सकाळी चांद्रयान-२ ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. कक्षा बदलाचा हा दुसरा टप्पा होता. चांद्रयान २ ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. चांद्रयान २ ची कक्षा बदलून पृथ्वीपासून २५१ किमी अंतरावर नेण्यात आले. सात सप्टेंबर रोजी चांद्रयान २ चंद्रावर उतरणार आहे.

२२ जुलै रोजी अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान (पेरिजी) १७० किमी व कमाल (एपोजी) ४५ हजार १४७५ किमी अंतरावर स्थिरावण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा चांद्रयान २ ची कक्षा बदलण्यात आली होती. चांद्रयान २ चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

पुढच्या दहा दिवसात आणखी तीन वेळा चांद्रयान २ च्या कक्षेमध्ये बदल करण्यात येणार आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान २ ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान २ मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता पुढचा कक्षा बदल २९ जुलैला असून त्यानंतर दोन आणि सहा ऑगस्टला हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१४ ऑगस्टला चांद्रयान २ चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. २० ऑगस्टला चांद्रयान २ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान २ मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान २ चा प्रयत्न असेल.