उदयपूर : देशाप्रमाणे काँग्रेसही अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. म्हणून निव्वळ जिवंत राहण्यासाठी नव्हे तर, पक्षाच्या वाढीसाठी संघटनात्मक बदल करावेच लागतील. नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटनात्मक सुधारणा कराव्या लागतील. पक्षाची रणनीतीही बदलावी लागेल. अगदी पक्षाच्या दैनंदिन कार्यपद्धतीमध्येही परिवर्तन करावे लागेल, असा स्पष्ट संदेश काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी पक्षाच्या चिंतन शिबिराच्या सुरुवातीला केलेल्या भाषणात दिला.

काँग्रेसचे तीन दिवसांचे चिंतन शिबीर उदयपूर येथे सुरू झाले. नेत्यांनी आता व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांना आळा घालून पक्षाला प्राधान्य दिले पाहिजे. पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे, असा निर्वाणीचा इशारा सोनिया गांधी यांनी ४०० हून अधिक पदाधिकाऱ्यांना दिला. पक्षामध्ये संघटनात्मक बदलाची मागणी बंडखोर नेत्यांनी वारंवार केली होती. नेत्यांचा प्रमुख आक्षेप राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर होता. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत सोनिया यांनी कोणा एका नेत्यावर वा नेतृत्वाला लक्ष्य करून प्रश्न सुटणार नाही, असे सूचित केले. पक्षाला मजबूत करण्याचे काम एकटय़ा-दुकटय़ाचे नाही. व्यापक सामूहिक प्रयत्नांमधूनच ते लक्ष्य गाठता येऊ शकते. हे चिंतन शिबीर त्यादृष्टीने टाकलेले प्रभावी पाऊल असेल, असेही सोनिया यांनी नमूद केले.

कपिल सिबल यांच्यासारखे नेते पक्षातील मतभेद अंतर्गत व्यासपीठावर न मांडता प्रसारमाध्यमांकडे व्यक्त करतात. त्याची गंभीर दखलही सोनियांनी घेतली. तुम्ही तुमचे विचार-मतभेद पक्षांतर्गत चर्चामध्ये उघडपणे मांडा पण, त्याची जाहीर वाच्यता करू नका. जाहीरपणे बोलताना एकीचाच संदेश दिला पाहिजे. संघटनात्मक एकता, संघटना मजबुतीसाठी सुरू असलेले कार्य आणि त्यासाठीचा दृढनिश्चय हे तीन मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, असे सोनियांनी स्पष्ट केले. 

संघ आणि भाजपने देशासमोर सामाजिक ध्रुवीकरणाचे आव्हान उभे केले आहे. एका बाजूला पं. नेहरूंचे देश घडवण्यातील योगदान अमान्य केले जात आहे तर, दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण सुरू आहे, असा आरोप सोनियांनी केला. दलित, अल्पसंख्य समाजाविरोधातील घटना, त्यांना दिली जाणारी दुय्यम नागरिकत्वाची वागणूक, आर्थिक समस्या, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, नोटबंदीचे दुष्परिणाम, बेरोजगारी आदी अनेक मुद्दय़ांचा ऊहापोह सोनियांनी भाषणात केला.

फोन बंद करा!

सोनियांच्या भाषणानंतर चिंतन शिबिरातील ठरावांवर चर्चा सुरू झाली. सोनियांच्या भाषणाआधीच पदाधिकाऱ्यांना मोबाइल फोन बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. पक्षांतर्गत चर्चेचा बोभाटा बाहेर केला जाऊ नये याची दक्षता घेण्यात आली. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये मुख्यालयात झालेल्या कार्यसमितीच्या बैठकीतील मुद्दे चर्चा सुरू असताना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवले जात होते. हे टाळण्यासाठी शिबिरात खूपच दक्षता घेतली असल्याचे आढळले.

पद फक्त पाच वर्षांसाठी..

पक्षात आता वर्षांनुवर्षे पदांवर राहता येणार नाही. एखाद्या पदाधिकाऱ्याला जास्तीतजास्त पाच वर्षे पदावर राहता येईल. त्यानंतर त्यांना पक्षाचे काम करावे लागेल. एक पद भूषवल्यानंतर किमान तीन वर्षे तरी संबंधित पदाधिकाऱ्याचा नव्या पदासाठी विचार केला जाणार नाही. हा प्रस्ताव संमत झाला तर काँग्रेस पक्षातही भाकरी फिरवली जाईल. मात्र, पक्षाध्यक्षपदालाही हा संभाव्य नियम लागू होणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

पदांवर तरुणांना संधी

दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी करताना पक्षात अधिकाधिक तरुण कार्यकर्त्यांना आकर्षित केले पाहिजे या मुद्दय़ाकडे काँग्रेसने गांभीर्याने लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील विविध संघटनात्मक आघाडय़ांमधील ५० टक्के पदांवर ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

आधी काम करा, मग उमेदवारी!

काँग्रेसमधील वशिलेबाजीला आळा घालण्याचा महत्त्वाचा निर्णय चिंतन शिबिरात घेण्यात आला. आता निवडणुकीत मागेल त्याला उमेदवारी दिली जाणार नाही. उमेदवारी हवी असेल तर, कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी किमान पाच वर्षे सक्रिय राहण्याची अट घातली जाणार आहे.

एक व्यक्ती एक उमेदवारी, अपवाद फक्त गांधी कुटुंब?

काँग्रेसवर घराणेशाहीची टीका करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरातील एकालाच उमेदवारी देण्याचा नियम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु या नियमाला गांधी कुटुंबाचा अपवाद केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. सध्या सोनिया गांधी रायबरेलीतून तर राहुल वायनाडमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. परंतु गांधी कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त अन्यांना मात्र नव्या नियमाचे पालन करावे लागेल.