वृत्तसंस्था, भोपाळ : तब्बल ७० वर्षांनंतर भारतातील जंगलात चित्ते फिरणार असले तर त्यांच्या संरक्षणाचे मोठे आव्हान वन विभागासमोर आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आलेल्या चित्त्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने ‘चित्ता मित्र’ हे पद निर्माण केले असून रमेशसिंह सिकरवार या स्थानिक ग्रामस्थाची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असलेल्या गावातील ज्येष्ठ नागरिक असलेला रमेशसिंह सिकरवार हा एकेकाळी दरोडेखोर म्हणून या भागात कुप्रसिद्ध होता. कालांतराने त्याने दरोडेखोरीचे काम सोडल्यानंतर गावात राहत होता. बहुतेक गावांतील स्थानिक रहिवासी अजूनही त्याला घाबरत असल्याने त्याची ‘चित्ता मित्र’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जेणेकरून चित्त्यांची शिकार होणार नाही, असे वन विभागाने सांगितले.

सिकरवार यांच्या दरोडेखोरांच्या टोळीने १९८४ मध्ये पोलिसांसमोर शरणागती पत्करली. सिकरवार या टोळीचे प्रमुख होते. एका दिवसात १३ गुराख्यांची हत्या करण्याचा गुन्हा सिकरवार यांच्यावर आहे. अपहरण आणि खुनाचे सुमारे ९१ गुन्हे सिकरवाल यांच्यावर दाखल आहेत. शिक्षा भोगल्यानंतर ते आपल्या गावात राहत होते. ७२ वर्षांचे वयोमान असलेल्या सिकरवार यांना परिसरातील जंगलाची खडानखडा माहिती आहे. जंगलातील ज्ञानामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुनो जंगल परिसरात शिकारीच्या प्रमाणात वाढ झाली असून सिकरवार यांची नियुक्ती केल्याने शिकारीला आळा बसेल, असा विश्वास वन विभागाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रमेशसिंग सिकरवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुनो येथील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. ‘‘वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रीच्या वेळी कुनोर जंगल परिसरात फारसे लक्ष देत नाहीत. जंगलामधील गावांमध्ये मोगिया समाजाचे नागरिक राहातात. मांसाहारी असलेला हा समाज वन्य प्राण्यांची शिकार करतो आणि त्यावर त्यांची उपजीविका चालते. ससा ते काळय़ा हरणाचे मांस या शिकाऱ्यांना सहज उपलब्ध होते. विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असते. मात्र ते शिकारींवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. वन कर्मचाऱ्यांना वन्य प्राण्यांपेक्षा स्वत:च्या जिवाची काळजी असते. त्यामुळे ते शिकारी व स्थानिकांशी सहसा वैर करत नाहीत,’’ असे सिकरवर यांनी सांगितले.