आपल्या जीवनातला महत्त्वाचा भाग बनलेला मोबाइल जीवघेणाही ठरु शकतो. अशीच एक घटना छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात घडली आहे. चार्जिंगला लावलेल्या फोनवर गेम खेळणा-या 12 वर्षांच्या मुलाच्या हातात मोबाइलचा स्फोट झाला. यामुळे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रवी सोनवाल असं मृत मुलाचं नाव आहे. घटना घडली त्यावेळी रवीचा एक मित्रही त्याचा गेम पाहात तेथेच होता, तो या स्फोटामुळे जखमी झाला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री रवी मोबाइलमध्ये गेम खेळत होता. त्यावेळी फोन चार्जिंगला लावला होता. त्याचवेळी मोठा स्फोट झाला आणि मोबाइल रवीच्या हातातच फुटला. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट इतका भीषण होता की, रवीच्या पोटाचा काही भाग बाहेर आला होता, तशाच अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्याच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया करण्यात आली पण त्याचा जीव वाचवता आला नाही, अखेर मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.