Chhattisgarh Mother Teresa School News : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून धार्मिक असहिष्णुतेशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बमडूमर गावातील मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमधील साडेतीन वर्षांच्या मुलीला मुख्याध्यापकांनी अमानुषपणे मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. केवळ राधे-राधे म्हणत नमस्कार केला म्हणून मुख्याध्यापकांनी या चिमुकलीचा शारीरिक छळ केला. या मुलीने शाळा सुटल्यावर घरी जाऊन आई-वडिलांना शाळेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून शाळेची मुख्याध्यापिका एला इव्हन कॉलव्हिन हिला अटक केली आहे.
ही घटना बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. शाळेत पोहोचल्यावर मुलीने राधे-राधे म्हणत मुख्याध्यापिकेला नमस्कार केला, त्यानंतर मुख्याध्यापिकेने तिच्या कानशिलात लगावली. मुख्याध्यापिका एला एवढ्यावरच थांबली नाही. तिने मुलीच्या तोंडाला चिकटपट्टी लावून टाकली. १५ मिनिटे ही चिकटपट्टी मुलीच्या तोंडावर लावून ठेवलेली. यासह एलाने मुलीला पुन्हा मारलं. ही मुलगी वर्गात रडत बसली. शाळा सुटल्यानंतर रडत-रडत आईला बिलगली. त्यानंतर तिने आईला शाळेत घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या शरिरावर मारहाणीचे डाग दिसत असल्याचं तिच्या पालकांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीचे वडील प्रवीण यादव यांनी नंदिनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहून गुन्हा दाखल करत मुख्याध्यापिकेला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पद्मश्री तंवर म्हणाले, “प्राथमिक तपासात आमच्या निदर्शनास आलं आहे की एका प्रश्नाचं उत्तर देऊ न शकल्याने मुलीला मुख्याध्यापिकेने अमानुषपणे मारहाण केली आहे. अशा प्रकारची मारहाण अनुचित व अस्वीकार्य आहे.”
बजरंग दलाकडून घटनेचा निषेध
या घटनेनंतर संपूर्ण दूर्ग जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी शाळेवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळा प्रशासन धार्मिग भेदभाव करत असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. बजरंग दलाचे पदाधिकारी म्हणाले, शाळांमध्ये अशा प्रकारची असहिष्णुता सामाजिक समस्या निर्माण करते.
छत्तीसगड सरकारचा शैक्षणिक विभाग कठोर कारवाई करण्याची शक्यता
दरम्यान, या घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ५०६, ५०४ व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत कलम ७२ व कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला छत्तीसगडच्या शैक्षणिक विभागाने देखील या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. शैक्षणिक विभाग शाळा प्रशासनाविरोधात प्रशासकीय कारवाई करण्याची शक्यता आहे.