शिकागोतील ओ हेयर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली. या दुर्घटनेत काही नागरिकांना दुखापत झाली आहे. या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण १७० जणांचा समावेश होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) ही घटना घडली. विमानाच्या मागील भागातून धूर निघू लागला. यानंतर लगेचच आपत्कालीन मदत पोहोचवणारी वाहने घटनास्थळी पोहोचली. ‘दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी मियामीसाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असणाऱ्या विमानाचा टायर फुटला. वैमानिकांकडून ही सूचना देण्यात आल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले’, अशी माहिती राज्य विमान प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
‘या दुर्घटनेमुळे विमानाच्या इंजिनाचे नुकसान झाले आहे. या अपघातात काहीजणांना किरकोळ स्वरुपाच्या दुखापती झाल्या आहेत. मात्र अद्याप तरी दुखापतग्रस्तांचा नेमका आकडा कळू शकलेला नाही,’ अशी माहिती एफएएचे प्रवक्ते टॉमी मॉलिनारोंनी दिली आहे. ‘इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. या विमानात एकूण १६१ प्रवासी आणि ९ प्रवासी होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले,’ असे अमेरिकन एअरलाईन्सच्या प्रवक्त्या लेसली स्कॉट यांनी सांगितले आहे.