Chief Election Commissioner Dnyanesh Kumar Press Conference : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या आरोपामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी काही पुराव्यांचं सादरीकरण केलं होतं. दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपानंतर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं आहे. राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर देत काही नेते मतदारांची दिशाभूल करत असल्याचं म्हटलं. तसेच निवडणूक आयोग अशा खोट्या आरोपांना घाबरत नाही नाही, असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे यावेळी म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाने काय म्हटलं?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, “सर्वात आधी निवडणूक आयोग मतदारांना एक संदेश देऊ इच्छित आहे. भारताच्या संविधानानुसार भारताचा प्रत्येक नागरिक आणि ज्याने १८ वर्ष पूर्ण केलं आहे त्या व्यक्तीने मतदान केलं पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक राजकीय पक्षांचा जन्म निवडणूक आयोगातील नोंदणी केल्यानंतरच होतो. मग असं असताना निवडणूक आयोग सर्वच राजकीय पक्षांबरोबर भेदभाव कसा करेल? निवडणूक आयोगासाठी ना कोणी विरोधीपक्ष, ना कोणी सत्ताधारी, आमच्यासाठी सर्व समान आहेत. आमच्यासाठी सर्व पक्ष एकसमान आहेत. निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही”, असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं.

“कोणत्याही राजकीय पक्षाचं कोणीही असो. मात्र, निवडणूक आयोग आपल्या संविधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही. गेल्या दोन दशकांपासून जवळपास मतदार याद्यांमधील त्रुटी सोडवण्यासाठी मागणी करण्यात आलेली होती. ती मागणी पूर्ण करण्यासाठी एसआयआर प्रक्रियेला सुरूवात करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्षांना आवाहन करत आहे की १५ दिवसांत मतदार यादीतील फेरतपासणी करण्यासंदर्भातील काही त्रुटी असतील तर सांगा. मात्र, काही राजकीय पक्षांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदार यांद्यातील त्रुटी दूर करण्यासाठीच एसआयआर प्रक्रियेची सुरूवात करण्यात आलेली आहे. बिहारमधील ७ करोड पेक्षा जास्त मतदार निवडणूक आयोगाच्या पाठिशी उभे आहेत. असं असताना आयोगावर कोणाता एखादा प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो?”, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधींच्या मतदान चोरीच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. काही नेते मतदारांची दिशाभूल करत असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. मात्र, आम्ही आमच्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर केला गेला. पण जनतेला भ्रमित करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा अपमान नाही तर काय आहे?”, असा सवालही निवडणूक आयोगाने केला.

पुढे बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, “निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केल्यानंतर कायद्यात अशी तरतूद आहे की ४५ दिवसांत राजकीय पक्ष सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीला आव्हान देऊ शकतात. याचिका दाखल करू शकतात. मात्र, ४५ दिवसांच्या कालावधीनंतर आता अशा प्रकारचे निराधार आरोप करणं योग्य नाही. मात्र, अशा प्रकारचे निराधार आरोप करण्यामागील हेतू आम्ही समजतो”, असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

“काहींनी वेगवेगळे आरोप केले. त्यानंतर आम्ही पुरावे मागितले तर कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. मात्र, निवडणूक आयोग अशा खोट्या आरोपांना घाबरत नाही. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारांना लक्ष्य करत अशा प्रकारचं राजकारण केलं जात आहे. मात्र, निवडणूक आयोग स्पष्ट करू इच्छित आहे की गरीब, श्रीमंत किंवा तरुण आणि महिला या सर्व मतदारांबरोबर निवडणूक आयोग खंबीरपणे उभे आहे”, असं निवडणूक आयोगाने म्हटलं.