Phone Tapping Of Chief Minister A. Revanth Reddy: भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या कार्यकाळात तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या व्यक्तींवर सतत पाळत ठेवण्यात आली होती. जुलै २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ही पाळत ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्या काळात तेलंगणात काँग्रेस विरोधी पक्षात होती आणि रेड्डी विरोधी पक्षनेते तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. असा आरोप आहे की, भारत राष्ट्र समिती सरकारच्या काळात (२०१४–२०२३) तेलंगणाच्या विशेष गुप्तचर शाखेने सुमारे ६०० लोकांचे फोन टॅप करून त्यांच्यावर पाळत ठेवली होती. याबाबत द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

काय आरोप आहेत?

डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बीआरएसचा पराभव केला आणि राज्यात सरकार स्थापन केले. सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने या फोन टॅपिंग आणि पाळत ठेवण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या प्रकरणात थेट आरोप असा आहे की, विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांव्यतिरिक्त नोकरशहा, व्यापारी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यांचे जोडीदार, ड्रायव्हर आणि बालपणीचे मित्र यांच्यावरही लक्ष ठेवण्यात आले. विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा विजय निश्चित करण्यासाठी हे करण्यात आले होते आणि यासाठी विरोधी नेत्यांसह बीआरएस बंडखोरांवरही लक्ष ठेवण्यात येत होते.

‘आर आर मॉड्यूल’

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी विशेष गुप्तचर शाखा कार्यालयात तैनात असलेले पोलीस उपाधीक्षक डी. प्रणीत राव आणि त्यांच्या पथकाने रेवंत रेड्डी यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, जवळचे सहकारी आणि पक्षातील सहकाऱ्यांचे प्रोफाइल तयार केले होते आणि त्याला ‘आर आर मॉड्यूल’ असे नाव देण्यात आले होते. यामध्ये त्यांची नावे, पत्ते, वाहन क्रमांक आणि त्यांच्या वारंवार भेटींचा समावेश होता.

त्या काळात रेवंत रेड्डी तेलंगणा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी केसीआर यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. ते केवळ केसीआरच नव्हे, तर राजकारणात सक्रिय असलेल्या त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवरही टीका करत होते. त्या काळात रेवंत रेड्डी यांनी अनेक वेळा आरोप केले होते की, त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.

बीआरएसकडून आरोपांचे खंडन

या सर्व प्रकरणावर भारत राष्ट्र समितीचे म्हणणे असे आहे की, केसीआर यांच्या सरकारच्या काळात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर पाळत ठेवण्यात आली नव्हती. पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आणि प्रवक्ते दासोजू श्रवण कुमार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हैदराबाद पोलीस अशा कारवाईमध्ये गुंतले आहेत. याचा कोणताही परिणाम होणार नाही.