तामिळनाडूतील सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी हे शनिवारी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. आज ११ वाजता हा ठराव सभागृहात मांडण्यात येईल.  या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर पलानीस्वामी यांच्या गटाला हादरा बसला आहे. पक्षाचे आमदार आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक आ. नटराज यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचे शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे पलानीस्वामी यांना पाठिंबा असलेल्या आमदारांची संख्या आता १२३ झाली आहे. राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा विश्वासदर्शक ठराव ३० वर्षांत प्रथमच मांडला जात आहे. आपल्या मतदारसंघातील जनतेसमवेत आपण चर्चा केली, पन्नीरसेल्वम यांचेच सरकार असावे असे जनतेचे मत आहे, त्यामुळे त्यांच्या मतांचे प्रतिबिंब आपण विधानसभेत मांडणार असल्याचे नटराज यांनी येथे सांगितले. हा विश्वासदर्शक ठराव नाही, तर सदसद्विवेकबुद्धीचा ठराव आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणाले. अम्मा (जयललिता) यांचे सरकार स्थापन होईपर्यंत माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पन्नीरसेल्वम यांना सध्या ११ आमदारांचा पाठिंबा आहे, मात्र पलानीस्वामी यांच्या गटातून पन्नीरसेल्वम यांनी काही आमदारांना फोडले तर पलानीस्वामी यांचे सरकार अल्पमतात जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ई. पलानीस्वामी यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पलानीस्वामी हे व्ही. शशिकला यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे आगामी काळात अण्णा द्रमुकची सूत्रे ही शशिकला यांच्याच हातात राहणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

ई. पलानीस्वामी यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणाने आणखी एक नाट्यमय वळण घेतले आहे. या अनपेक्षित वळणामुळे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असणारे ओ. पनीरसेल्वम पूर्णपणे एकटे पडल्याचे चित्र आहे. मोजक्या खासदारांचा पाठिंबा वगळता अण्णाद्रमुकमधील सर्वजण त्यांच्यापासून दुरावले आहेत. काल राजभवनात ई. पलानीस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला सर्व आमदारांनी झाडून लावलेली उपस्थिती याबद्दल बरेच काही सांगून जाणारी होती.

Live Updates
12:32 (IST) 18 Feb 2017
तामिळनाडू विधानसभेचं कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब
12:31 (IST) 18 Feb 2017
तामिळनाडू विधानसभेत विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीची तोडफोड,माईक भिरकावला
11:13 (IST) 18 Feb 2017
ओ. पन्नीरसेल्वम यांच्या गटाकडून गुप्त मतदानाची मागणी
11:11 (IST) 18 Feb 2017
तामिळनाडूच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या प्रक्रियेला सुरुवात
11:02 (IST) 18 Feb 2017
शशिकला यांच्या गटाकडून १२२ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा
11:01 (IST) 18 Feb 2017
तामिळनाडू विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
09:45 (IST) 18 Feb 2017
मुख्यमंत्री पलानीस्वामी बहुमत सिद्ध करण्यासाठी सचिवालयात पोहचले