चिलीमधील चिंचोरो ममीजचा युनेस्कोकडून जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. युनायटेड नेशन्सच्या सांस्कृतिक संघटनेने ट्विटरवर याबाबतची घोषणा केली. चीनच्या अध्यक्षतेखाली युनेस्कोची व्हर्चुअल बैठक झाली. यावेळी चिंचोरो संस्कृतीच्या अनन्यसाधारण आणि जागतिक महत्व असलेल्या वसाहतींना युनेस्को आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देत आहे, असे चिली मानववंशशास्त्रज्ञ बर्नार्डो अरिझा यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचोरोमधील ममी जगातील सर्वात प्राचीन असून त्यांच्या शोध मॅक्स उहले यांनी २०व्या शतकाच्या सुरुवातीस उत्तर चिलीमध्ये लावला होता. या ममीज तब्बल ७ हजार वर्ष जुन्या असून इजिप्तमधील ममीजपेक्षा २ हजार वर्ष जुन्या आहेत. चिंचोरो या शब्दाचा अर्थ ‘मासेमारी बोट’ असा आहे. चिंचोरोमध्ये ७ हजार वर्षांपूर्वी मच्छिमारांचं आणि शिकाऱ्यांचं वास्तव्य होतं. ते उत्तर-चिलीतील अटाकामा वाळवंटाच्या किनारपट्टीवर राहून लूटा व्हॅलीपासून लोआ नदीपर्यंत आणि दक्षिणी पेरूमध्ये वास्तव्य करत होते. याठिकाणी प्रशांत महासागर आणि वाळवंट एकमेकांना भेटतात.

दरम्यान, याठिकाणी आतापर्यंत ३०० ममीज आढळल्या असून त्या लाल, काळ्या रंगांच्या आणि बँडेज केलेल्या आहेत. ममी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवी शरीरातील अवयव, आतडे आणि उती काढून टाकल्या जातात. त्यानंतर मृतदेहाची त्वचा काढून काठी आणि प्राण्यांच्या केसांचा वापर करून पुन्हा शरीर तयार केले गेले आहे. तर दाट काळ्या केसांचे डोके बनवले गेले. त्यानंतर त्या ममी लाल आणि काळ्या रंगाने रंगवण्यात आल्या. त्यासाठी मँगनीज, आयरन ऑक्साईड आणि रंगद्रव्यांचा वापर करण्यात आला.

“या ममीज तज्ज्ञांनी तयार केल्या होत्या. या ममीज इथल्या समुदायातील पहिल्या लोकसंख्येच्या सर्जनशीलतेचा उत्तम नमुना आहेत. पण मृत पावलेल्या लोकांच्या ममी का बनवण्यात आल्या, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे, ”असं अरिझा म्हणतात. ते अरिका शहरामध्ये तारापाका विद्यापीठाच्या चिंचोरो सेंटरचे संचालक आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chiles ancient chinchorro mummies added to unescos world heritage list hrc
First published on: 28-07-2021 at 12:56 IST