पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आला आहे. गेल्यावर्षीही चीनने संयुक्त राष्ट्रात चीनने ‘नकाराधिकाराचा’ वापर करत भारताच्या प्रयत्नांना खीळ घातली होती. अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्तपणे प्रस्ताव मांडला होता. मात्र, या ठरावावर एकमत होऊ शकत नसल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात १५ देशांचा समावेश असलेल्या संयुक्त राष्टाच्या समितीमध्ये हा ठराव मांडण्यात आला होता. तेव्हा चीन वगळता उर्वरित १४ देशांनी भारताच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली होती. हा प्रस्ताव मान्य झाला असता तर मसूद अजहरची संपत्ती गोठवली गेली असती आणि त्याच्यावर प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली असती. सूत्रांच्या माहितीनुसार चीनने आज पुन्हा एकदा सर्वानुमत नसल्याचे कारण पुढे करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कारण पुढे करत चीनने हा प्रस्ताव अडवून ठेवला होता. मात्र, आज ती मुदत संपुष्टात आली. ऑगस्ट महिन्यात चीनने या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली होती. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीनकडून वारंवार मसूद अजहरच्या वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. विशेष म्हणजे नकाराधिकार असल्याने चीनचे आतापर्यंतचे प्रयत्न यशस्वीदेखील ठरले आहेत.