नवी दिल्ली : चीनमध्ये आढळलेला करोनाचा (कोविड १९) पहिला रुग्ण हा वुहान बाजारपेठेतील एक विक्रेता होता, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यासंबंधीचा लेख ‘सायन्स’ या नियतकालिकात गुरुवारी प्रसिद्ध झाल्याचे वृत्त न्यू यॉर्क टाइम्सने दिले आहे. त्यामुळे चीनमध्ये करोना साथीचे उगमस्थान हे वुहान बाजारपेठेतील मांसविक्रीची दुकाने आहेत, की वुहान विषाणू प्रयोगशाळा की अन्य काही, हा वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये प्रारंभिक काळात नोंदल्या गेलेल्या करोना रुग्णांचा अभ्यास केलेल्या शास्त्रज्ञाने गुरुवारी म्हटले आहे की, चीनमधील करोनाचे उगमस्थान शोधण्यासाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने याबाबत चुकीची मीमांसा केल्याची शक्यता आहे. संशोधनात नव्याने पुढे आलेल्या विश्लेषणानुसार, करोनाची लागण झाल्याने प्रकृती बिघडलेला पहिला रुग्ण हा वुहान पशुविक्री बाजारातील एक विक्रेता होता. वुहान बाजारपेठेपासून अनेक मैल दूर राहात असलेला एक लेखा अधिकारी करोनाचा पहिला रुग्ण असल्याची माहिती चुकीची आहे.

अ‍ॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञ मायकेल वोरोबे यांनी हा दावा केला आहे. ते विषाणू उत्परिवर्तन शाखेतील आघाडीचे तज्ज्ञ आहेत. चीनमधील करोनाच्या पहिल्या रुग्णांबाबत जाहीर झालेल्या नोंदी आणि चिनी माध्यमांतील मुलाखतींचा अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या विक्रेत्याचा हूनान येथील घाऊक मत्स्यबाजाराशी संबंध येत होता. नव्या संशोधनानुसार याच बाजाराशी पहिल्या करोना रुग्णाचा संबंध दिसून येतो. त्यामुळे करोना साथीचे उगमस्थान तेच असावे.