द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने अन्सारी यांच्या दौऱ्यास महत्त्व

भारतात सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकार सत्तारूढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे पंचशीलचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी येथे येत असून उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना असल्याचे चीनने म्हटले आहे.

भारतात सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकार सत्तारूढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे पंचशीलचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी येथे येत असून उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना असल्याचे चीनने म्हटले आहे.
हमीद अन्सारी हे येत्या २७ जूनपासून चार दिवसांसाठी चीनच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यासंबंधी चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनियांग यांनी शुक्रवारी माध्यमांना यासंबंधी माहिती दिली. उपराष्ट्रपती अन्सारी हे चीनच्या दौऱ्यावर येत असल्याची बाब चीनसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे चुनियांग यांनी नमूद केले. भारतात नवीन सरकारचा शपथविधी झाल्यानंतर प्रथमच त्यांचे नेते येथे येत आहेत आणि भारत-चीन संबंधांच्या दृष्टीने नव्या वातावरणात या मुद्दय़ास महत्त्व आहे, असे ते म्हणाले.
चीनमध्ये ‘पंचशील’ चा हीरक महोत्सव दोन दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी अन्सारी यांच्याव्यतिरिक्त चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग, म्यानमारचे अध्यक्ष यु थीन सेन हेही या महोत्सवात सामील होणार आहेत. २८ व २९ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात चीनचे पंतप्रधान ली केक्विआंग हेही सहभागी होतील.
भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने चीनचे तत्कालीन पंतप्रधान चाऊ एन लाय आणि म्यानमारच्या तत्कालीन नेत्यांच्या सहभागातून १९५४ मध्ये पंचशीलची स्थापना करण्यात आली होती. जागतिक स्तरावर शांतता आणि सहकार्य प्रस्थापित व्हावे म्हणून ‘पंचशील’ आजही मार्गदर्शक ठरते, असे हुआ यांनी सांगितले.
पंचशीलची सूत्रे
*परस्परांचे सार्वभौमत्व आणि ऐक्याचा आदर राखणे
*परस्परांवर चढाई न करणे
*परस्परांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ न करणे
*परस्परांच्या फायद्यासाठी समानता आणि सहकार्याचे सूत्र ’प्रस्थापित  शांततापूर्ण अस्तित्वासाठी साहचर्य

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: China looks to hamid ansaris visit to mark new chapter in ties