चीनने महासंगणकाच्या क्षेत्रात वरचष्मा कायम ठेवला असून लागोपाठ चौथ्यांदा त्यांचा तियानहे-२ हा संगणक अमेरिकेतून जाहीर होणाऱ्या पहिल्या पाचशे महासंगणकांच्या यादीत पहिला आला आहे, ही यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
तियानहे -२ हा संगणक चीनच्या नॅशनल युनिव्हर्सटिी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी या संस्थेने तयार केला असून तो सेकंदाला ३३.८६ पेंटाफ्लॉप या वेगाने काम करू शकतो. याचा अर्थ तो ३३८६० क्वाड्रिलियन (एकावर पंधरा शून्य) इतकी गणने सेकंदाला करू शकतो.  दक्षिण चीनमधील ग्वांगझाउ येथील नॅशनल सुपरकॉम्प्युटर सेंटर येथे हा संगणक बसवण्यात आला असून त्यात अजून सुधारणा करीत वेग १०० पेंटाफ्लॉप करण्याचा विचार आहे. महासंगणकांची सुधारित यादी गेल्या आठवड्यात अमेरिकेने जाहीर केली असून आता अमेरिका दोन महासंगणक तयार करण्यासाठी ३२.५ कोटी डॉलर खर्च करणार आहे. ते दोन्ही महासंगणक चीनच्या तियानहे महासंगणकापेक्षा तीन ते पाच पट वेगवान असतील. असे असले तरी सध्या तियानहे-२ या महासंगणकाच्या अव्वल स्थानाला धोका नाही, कारण अमेरिकेचे वेगवान महासंगणक तयार होण्यास २०१८ साल उजाडणार आहे, असे टेनिसी विद्यापीठाचे प्राध्यापक व टॉप ५०० महासंगणक यादीचे संपादक जॅक डोगरा यांनी ‘शिनहुआ’ या वृत्तसंस्थेला सांगितले. २०१८ पर्यंत तरी तियानहे २ या महासंगणकाला कुणी मागे टाकण्याची शक्यता नाही, असे ते म्हणाले.
ओक रीज नॅशनल लॅबोरेटरी येथील ‘टायटन’ हा महासंगणक दुसरा आला असून त्याचा वेग सेकंदाला १७.५९ पेंटाफ्लॉप आहे.लॉरेन्स लीव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी येथील ‘सिक्वोइया’ हा महासंगणक तिसरा आला असून त्याचा वेग सेकंदाला १७.१७ पेंटॅफ्लॉप आहे.
जपानचा ‘के’ महासंगणक चौथ्या क्रमांकावर आला असून त्याचा वेग सेकंदाला १०.५१ पेंटाफ्लॉप आहे, त्यानंतर अरगॉन नॅशनल लॅबोरेटरी येथील ‘मीरा’ महासंगणकाने सेकंदाला ८.५९ पेंटाफ्लॉप वेग दाखवून पाचवा क्रमांक मिळवला आहे. महासंगणक क्षेत्रात अमेरिकेची सरासरी आघाडी जास्त असून त्यांच्याकडे २३१ महासंगणक आहेत, त्याखालोखाल चीन, जपान, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांचे क्रमांक लागतात.

पहिले पाच महासंगणक व त्यांचा सेकंदाला वेग (वेग पेंटाफ्लॉपमध्ये)
टायटन       १७.५९
सिक्वोइया १७.१७
के               १०.५१
मीरा            ८.५९