एपी, बीजिंग : चीनचा सत्ताधारी साम्यवादी पक्ष आपल्या भूप्रदेशाचा भाग म्हणून दावा करत असलेल्या तैवानला वेगळे पाडण्याचे प्रयत्न वाढवताना; तैवानला शस्त्रे पुरवल्याबद्दल चीनने गुरुवारी अमेरिकेची लॉकहीड मार्टिन कंपनी आणि रेथेऑनचे एक युनिट यांच्यावर व्यापार व गुंतवणूकविषयक निर्बंध लादले.
लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशन आणि रेथेऑन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनच्या ‘रेथेऑन मिसाइल्स अँड डिफेन्स’ यांना चीनमध्ये वस्तू आयात करण्यास किंवा देशात नवी गुंतवणूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले. देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा किंवा विकासविषयक हितसंबंध धोक्यात आणू शकणाऱ्या ‘अविश्वसनीय कंपन्यांच्या’ यादीत त्यांचा समावेश करून त्यांच्या व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले असल्याचे मंत्रालयाने सांगितले. या बंदीचा काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिका चीनला शस्त्रसंबंधित तंत्रज्ञान विकण्यावर बंदी घालते, मात्र काही लष्करी कंत्राटदारांचा अवकाश आणि इतर बाजारपेठांमध्ये नागरी व्यवसायही आहे.
१९४९ साली एका नागरी युद्धानंतर तैवान व चीन हे विभक्त झाले. सुमारे २.२ कोटी लोकसंख्येचा बेटाच्या स्वरूपातील हा देश कधीही चीनच्या जनवादी प्रजासत्ताकाचा भाग राहिलेला नाही, मात्र गरज भासल्यास बळाने या देशाने मुख्य भूमीशी एकसंध होणे त्याच्यावर बंधनकारक असल्याचे चिनी साम्यवादी पक्षाचे म्हणणे आहे. अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या सरकारने तैवान बेटानजीक लढाऊ व बॉम्बवर्षांव करणाऱ्या विमानांचे उड्डाण करून आणि समुद्रात क्षेपणास्त्रे डागून या देशाला धमकावण्याचे प्रयत्न वाढवले आहेत.