अरूणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सीमेवर दोन हजार किलोमीटर रस्ते बांधण्याच्या योजनेबद्दल चीनकडून करण्यात आलेल्या नापसंतीदर्शक वक्तव्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरूवारी प्रत्युत्तर दिले. सद्यस्थितीत भारत एक शक्तिशाली देश आहे. त्यामुळे  भारताला कोणीही धमकावू शकत नाही, अशा शब्दांत राजनाथसिंह यांनी अप्रत्यक्षपणे चीनला इशारा दिला. सीमाप्रश्न सोडवायचा असेल तर, भारत-चीन एकत्र बसून चर्चा करावी, असे त्यांनी यावेळी सुचवले. चीनने यापूर्वीच त्यांच्या प्रदेशात रस्त्यांचे आणि रेल्वेमार्गाचे जाळे पसरवले आहे. तेव्हा आम्ही आमच्या हद्दीमध्ये काय करतो, याची चीनने चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
चीन आणि भारत यांच्या पूर्वेकडील सीमांविषयी वाद आहेत. याविषयी तोडगा निघण्यापूर्वीच भारताकडून कोणतेही पाऊल उचलले जाऊ नये, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते होंग लेई यांनी बुधवारी सांगितले होते…