भारताची सीमा, हाँगकाँग किंवा दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कारवाया या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या वर्तनाचाच एक भाग आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे.
पूर्व लडाखच्या डोंगराळ क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर गेल्या चार आठवडय़ांपासून भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. वाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू आहे.
चीनचे सैनिक मोठय़ा प्रमाणावर भारताच्या उत्तरेकडे सरकल्याचे चित्र दिसत आहे, हाँगकाँगमधील जनतेच्या स्वातंत्र्यावरही चीनने घाला घातला आहे, असेही पॉम्पिओ यांनी वादग्रस्त कायद्याच्या अनुषंगाने म्हटले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन वेगाने लष्करी आणि आर्थिक कारवाया करीत आहे, त्यामुळे त्या क्षेत्रातील अनेक देशांची चिंता वाढली आहे, असेही ते म्हणाले.
भारताची सीमा, हाँगकाँग अथवा दक्षिण चीन सागरात चीनने अलीकडे केलेल्या कारवाया चीनच्या वर्तणुकीचाच एक भाग असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही पॉम्पिओ म्हणाले. केवळ सहा महिन्यांपासूनच नव्हे तर अनेक वर्षांपासून हा प्रकार आम्ही पाहात आहोत, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.