चीनचे माजी परराष्ट्रमंत्री चिन गांग (Qin Gang) यांना जुलै २०२३ मध्ये मंत्री पदावरून दूर करण्यात आले होते. अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून काम करत असताना त्यांचे एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले, ज्यातून महिलेला एक मुलगा झाला होता. तसेच त्यांच्यावर हेरगिरी केल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता. हकालपट्टी झाल्यानंतर अनेक दिवस ते बेपत्ता असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता ते मृत पावले असल्याची नवी माहिती समोर आली असून आत्महत्या किंवा छळ करून त्यांची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिटिको या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांशी लागेबंधे असलेल्या दोन जणांनी माहिती दिली की, जुलै महिन्याच्या अखेरीस बीजिंगच्या सैनिकी रुग्णालयात चिन गांग यांचा मृत्यू झाला. याच रुग्णालयात चीनच्या महत्त्वाच्या व्यक्तींवर उपचार केले जातात.

अमेरिकेच्या वॉल स्ट्रिट जर्नल (WSJ) वर्तमानपत्रात १९ सप्टेंबर रोजी एक लेख छापून आला होता. या विवाहबाह्य संबंधामुळे किंवा इतर कारणांमुळे चिन गांग यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड तर केली नाही ना? याचा तपास केला जात असून चिन गांग तपासात सहकार्य करत आहेत, असेही या लेखात म्हटले होते. चिन गांग यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार देण्याआधी त्यांनी जुलै २०२१ पासून ते जानेवारी २०२३ पर्यंत अमेरिकेतील चीनचे राजदूत म्हणून काम केले होते. वॉशिंग्टनमध्ये चीनचे सर्वोच्च दूत म्हणून काम करत असताना चिन गांग यांनी एका महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवले, ज्यामुळे संबंधित महिलेला अमेरिकेत एक मुलगा झाला, असे या लेखात नमूद केले आहे.

हे वाचा >> विवाहबाह्य संबंधामुळे चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांची हकालपट्टी; वर्तमानपत्राच्या लेखामुळे खळबळ

चिन गांग यांच्या संबंधीची बातमी जुलै महिन्यात बाहेर आल्यानंतर कम्युनिस्ट पक्षानेही अंतर्गत समिती स्थापन करून चिन गांग यांची चौकशी सुरू केली होती. अमेरिकेत राजदूत म्हणून काम करत असताना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी हेरगिरी केली का? याचीही चौकशी केली जात होती.

चिन गांग यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्याजागी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी वांग यी यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

चिन गांग कोण होते?

चिन गांग यांचा जन्म १९६६ साली झाला. १९८८ साली ‘बिजिंग सर्विस ब्युरो फॉर डिप्लोमॅटिक मिशन्सच्या कर्मचारी सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली. इथून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर त्यांनी अनेक पदावर काम केले. जसे की, ब्रिटनमधील चिनी दूतावासात अनेक वर्ष विविध पदावर काम केले. त्यांची दोन वेळा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन वर्ष अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून काम केल्यानंतर २०२३ साली त्यांची चीनच्या परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. चिन गांग यांच्या झटपट भरभराटीमागे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी त्यांची असलेली जवळीक कारणीभूत असल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले होते.