एकत्र कुटुंब पद्धती ते विभक्त कुटुंब पद्धती असा भारतीय समाजरचनेचा प्रवास होताना आपण पाहात आहोत. जगभरात अनेक देशांमध्ये खूप आधीच अशी समाजरचना अस्तित्वात आली आहे. पण अजूनही समाज म्हणून मानवजात सातत्याने बदलत आहे. अनेक नवनवे बदल किंवा या बदलाचे प्रकार आपल्याला दिसत असतात. चीनमध्ये असाच एक प्रकार सध्या दिसू लागला आहे. त्याचे परिणाम अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी हे प्रस्थ सध्या चीनमध्ये वेगाने फोफावताना दिसत आहे. चीनची आर्थिक स्थितीही त्याला कारणीभूत ठरली आहे.

पूर्णवेळ अपत्य? हा काय प्रकार आहे?

चीनमध्ये गेल्या वर्षाच्या शेवटी तिथला लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (चीनमध्ये इतर प्रचलित प्लॅटफॉर्म्सवर बंदी वा निर्बंध आहेत) ‘डोवबन’वर (Douban) यासंदर्भात एक संकल्पना चर्चेत आली होती. सीएनएननं यासंदर्भात वृत्त दिल्याचा दाखला एएनआय वृत्तसंस्थेनं दिला आहे. यामध्ये पहिल्यांदा ‘पूर्णवेळ मुलं आणि मुली’ अर्थात ‘फुल टाईम सन्स अँड डॉटर्स’ ही संकल्पना झळकली होती.

हजारो तरुण निवडतायत पर्याय!

यामध्ये मुलं आपल्याच घरी आपल्याच आई-वडिलांची चक्क नोकरी करतात! म्हणजे काय, तर मुलांनी बाहेर कुठे नोकरी करण्याऐवजी आपल्याच घरी आपल्याच पालकांची काळजी घेण्याची, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची, त्यांना काय हवं-नको ते बघण्याची, आणून देण्याची नोकरी करायची. त्याबदल्यात पालक त्यांना अगदी ‘मार्केट रेट’नुसार योग्य असा रीतसर पगार देणार! हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं, तरी चीनमध्ये हजारो तरुण ‘नोकरी’चा हा पर्याय निवडत असल्याचं दिसत आहे.

एएनआयनं याबाबत एक उदाहरण दिलं आहे. लोयांग प्रांतात राहणारी २१ वर्षांची ली अशाच प्रकारे तिच्या घरी नोकरी करत आहे. तिच्या आजीला स्मृतीभ्रंश झाला आहे. ली तिच्या आजीची काळजी घेते, तिच्या कुटुंबासाठी बाजारातून सामान खरेदी करून आणून देते. तिचे पालक या कामासाठी तिला महिन्याला ६ हजार युआन अर्थात जवळपास ८३५ अमेरिकन डॉलर्स इतका पगार देतात! हा पगार ‘मार्केट स्टँडर्ड’नुसार बऱ्यापैकी पुरेसा आहे!

चीनच्या आगळिकीवर भारताचं सडेतोड उत्तर; वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सहभागास नकार; खेळाडू विमानतळावरूनच माघारी!

“मी बाहेर शिकण्यासाठी किंवा कामासाठी जाण्याचा ताण सहन करू शकत नाही. त्यामुळे मी घरीच असते. मला माझ्यासारख्या इतर तरुणांशी स्पर्धा करायची नाहीये. त्यामुळे मी पूर्णपणे निवांत राहण्याचा निर्णय घेतलाय”, असं ली सांगते. “मला गरज नसताना उगीचच जास्त पगाराची नोकरी किंवा उत्तम राहणीमान वगैरे नकोच आहे”, असंही ती म्हणते.

चीनमधली बेरोजगारी!

चीनमधले असे हजारो तरुण-तरुणी आपल्या सोशल मीडिया आकाऊंट्सवर ‘पूर्णवेळ अपत्य’ हीच आपली ओळख सांगत आहेत. काहीजण इतर ठिकाणी आपल्याला नोकरी मिळाली नाही म्हणून आपण घरी परत येत असल्याचंही म्हटलं आहे. यामुळे चीनमधल्या बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचंच अधोरेखित होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनमध्ये मोठ्या शहरांमध्ये १६ ते २४ वयोगटाच्या मुलांचा बेरोजगारीचा दर गेल्या महिन्यात तब्बल २१.३ टक्के इतका विक्रमी पातळीवर पोहोचला होता. करोनानंतरच्या काळात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चीनकडून करण्यात आलेल्या उपाययोजना अपयशी ठरल्याचा हा एक परिणाम सांगितला जातो. सरकारी आकडेवारीपेक्षाही खरी स्थिती अधिक गंभीर असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.