चिनी हॅकर्सकडून आधारच्या डेटाची चोरी; अहवालातून उघड झाली धक्कादायक माहिती

UIDAI मध्ये १ अब्जाहून अधिक भारतीय नागरिकांची खासगी माहिती बायोमेट्रिक पद्धतीने साठवण्यात आली आहे.

Chinese hackers aadhaar database UIDAI times group record future report

सायबर सिक्युरिटी फर्म रेकॉर्ड फ्यूचर इंकच्या नवीन अहवालानुसार, चीन पुरस्कृत हॅकर्सनी आता भारतीय डेटा एजन्सी आणि मीडिया संस्थांना लक्ष्य केले आहे. ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, चीनच्या हॅकर्सनी आधारची माहिती सुरक्षित ठेवणाऱ्या यूआयडीएआय (UIDAI) आणि देशातील एका प्रमुख माध्यम समूहाची माहिती चोरल्याची घटना समोर आली आहे. मात्र, यूआयडीएआयने सायबर सुरक्षा कंपनीचा हवाला देत हा अहवाल नाकारला आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला UIDAI असेही म्हणतात, मध्ये १ अब्जाहून अधिक भारतीय नागरिकांची खासगी माहिती बायोमेट्रिक पद्धतीने साठवण्यात आली आहे. या वर्षाच्या जून आणि जुलै दरम्यान यूआयडीएआयच्या नियमांचे उल्लघंन करत घुसखोरी करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार कोणती माहिती हस्तगत केली गेली हे स्पष्ट झालेलं नाही असे रेकॉर्ड फ्यूचरने म्हटले.

मात्र यूआयडीएआय सातत्याने ठामपणे सांगत आहे की आधारची माहिती ही एन्क्रिप्ट केलेली माहिती आहे आणि अनेक स्तरांवर प्रमाणीकरणानंतरच त्यात प्रवेश केला जाऊ शकतो. सरकारकडे मजबूत सुरक्षा व्यवस्था आहे आणि ती माहिती सुरक्षित राहण्यासाठी सतत अपग्रेड केली जाते असे यूआयडीएआयने म्हटले आहे.यापूर्वीही आधारची माहितीची चोरी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.

बेनेट कोलमन अँड कंपनी, ज्याला टाइम्स ग्रुप म्हणूनही ओळखले जाते त्यांना देखील चिनी हॅकर्सने लक्ष्य केले असल्याचे दिसून आले. फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान कंपनीमधून माहिती काढण्यात आली होती, पण माहितीची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले नाही, असे रेकॉर्ड फ्यूचरने म्हटले आहे. कंपनीने हा अहवाल फेटाळून लावत त्यांच्या सायबर सिक्युरिटी डिफेन्सने ही चोरी थांबवल्याचे म्हटले आहे.

बोस्टनजवळील सायबरसुरक्षा फर्म रेकॉर्ड फ्यूचरने म्हटले आहे की, त्यांनी सरकारी संस्था आणि माध्यम समूहाचे सर्व्हर आणि मालवेअर वापरून हॅकर्सद्वारे वापरले जाणारे सर्व्हर यांच्यातील संशयास्पद नेटवर्कबाबत माहिती मिळवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली.

हॅकर्सनी कथित डेटा व्यतिरिक्त, सरकारी संस्था आणि माध्यम समूहाच्या कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये काही सॉफ्टवेअर टाकले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हॅकर्स मागणीनुसार माहिती काढू शकतील असे रेकॉर्ड फ्यूचरने म्हटले आहे. हॅकर्सने विंटी नावाच्या मालवेअरचा वापर केला, जो वर्षानुवर्षे मोठ्या संख्येने चिनी हॅकर्सद्वारे वापरला गेला आहे. यासाठी कोबाल्ट स्ट्राइक या सॉफ्टवेअरचादेखील वापर करण्यात आला होता जो सामान्यतः नेटवर्क डिफेन्ससाठी वापरला जातो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chinese hackers aadhaar database uidai times group record future report abn