भारताच्या हद्दीत असलेल्या दौलतबेग ओल्डी क्षेत्रात घुसखोरी करून अरेरावी करणाऱ्या चीनने पुन्हा तोच प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, यावेळी चुमार क्षेत्रात उद्दाम चिनी सैनिकांनी आपले घोडे दामटले. १६ जुलै रोजी हा प्रकार घडला. भारतीय लष्कराने मात्र या चिनी सैनिकांना हुसकावून लावल्याचे स्पष्ट केले आहे.
लेहपासून ३०० किमी अंतरावर असलेल्या चुमार क्षेत्रात १७ जूनला चिनी सैनिकांनी भारतीय ठाण्यावर लावलेल्या टेहळणी कॅमेराची नासधूस करून तो पळवून नेला होता. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी ३ जुलैला चीनभेटीला रवाना होण्यापूर्वी चिनी सैनिकांनी हा कॅमेरा भारताच्या हवाली केला होता. हा प्रकार ताजा असतानाच आता १६ जुलै रोजी ५० चिनी सैनिकांनी घोडे आणि खेचरांवर स्वार होऊन पुन्हा चुमार क्षेत्रात घुसखोरी केली. या भागात खोलवर त्यांनी रपेटही मारली.
ही बाब भारतीय लष्कराच्या ध्यानात आल्यानंतर १७ जुलैला चिनी सैनिकांनी माघार घेतली. त्यानंतर उभय बाजूच्या ध्वजसंचालन बैठकीत हा घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याच भागात ११ जुलै रोजी चीनच्या दोन विमानांनी भारतीय वायू सीमा ओलांडली होती़  त्यानंतर पाचच दिवसांत झालेल्या घुसखोरीमुळे हे प्रकरण भारतासाठी अधिक चिंताजनक बनले आह़े