जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुच्या संसर्गाची सुरुवात ज्या चीनमधून झाली होती. त्या चीनमधून एक दिलासादायक बातमी आहे. चीनमध्ये करोनाचा कहर संपला असल्याचे चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वुहान शहरातील नव्या रुग्णांची संख्या आता एक आकड्यापर्यंत खाली आली आहे. चीनमधील वृत्तवाहिनी चायना शिंहुआ न्यूजने देखील या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार, करोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असून विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण खालच्या पातळीवर पोहोचले आहे. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या प्रवक्त्या मी फेंग यांनी बीजिंग येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. फेंग यांनी म्हटलं की, “चीनमधील हुबई प्रांतातील सर्वाधिक फटका बसलेल्या वुहान शहरातून नव्या रुग्णांची संख्या कमी झाली असून ती एक आकड्यापर्यंत खाली आली आहे. बुधवारी इथे केवळ ८ रुग्णांचीच नोंद झाली.”

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, करोना विषाणूचा फैलाव जगातील ११४ देशांमध्ये झाला असून इटली आणि अमेरिकेमध्ये याचा फैलाव रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्यात आली आहे. इटलीच्या प्रशासनाने आवश्यक सेवा आणि दुकानं दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर अमेरिकेकडून युरोपात जाणाऱ्या विमान उड्डाणांवरच बंदी घातली आहे. चीनमध्ये गेल्या वर्षाच्या शेवटी या विषाणूच्या प्रकोपाला सुरुवात झाली होती. बिझनेस स्टॅंडर्डने याबाबत वृत्त दिले आहे.

जगभरात १,२६,००० लोक या विषाणूमुळे बाधित झाले आहेत, अशी जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. यांपैकी ६८,००० लोकांची प्रकृती पुन्हा पूर्वपदावर आली असल्याचे करोना आजारावर लक्ष ठेवून असलेल्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.